जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 42 जणांचा मृत्यू

*200 हून अधिक लोक बेपत्ता; 65 जणांना वाचविण्यात यश

नवी दिल्ली/14 ऑगस्ट – गुरुवारी दुपारी 12:30 वाजता जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात ढगफुटी झाली. डोंगरावरील पाण्यात आणि ढिगार्‍यात अनेक लोक अडकले. या अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 65 जणांना वाचवण्यात आले आहे. 200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मचैल माता यात्रेसाठी किश्तवाडमधील पद्दार उपविभागातील चशोटी गावात हजारो भाविक पोहोचले होते, तेव्हा हा अपघात झाला. यात्रेचा हा पहिला थांबा आहे. यात्रा जिथून सुरू होणार होती तिथेच ढगफुटी झाली. येथे बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांची अनेक दुकाने होती. सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेले. किश्तवाड शहरापासून सुमारे 90 किमी अंतरावर आणि मचैल माता मंदिराकडे जाणार्‍या मार्गावरील पहिले गाव म्हणजे चशोटी. हे ठिकाण 14-15 किमी अंतरावर असलेल्या पद्दार खोर्‍यात आहे. या भागातील पर्वत 1,818 मीटर ते 3,888 मीटर उंचीचे आहेत. इतक्या उंचीवर, हिमनद्या आणि उतार आहेत, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होतो.मचैल माता तीर्थयात्रा दरवर्षी ऑगस्टमध्ये होते. हजारो भाविक तिथे येतात. ती 25 जुलै ते 5 सप्टेंबर पर्यंत चालेल. जम्मू ते किश्तवाड हा मार्ग 210 किमी लांब आहे आणि पद्दार ते चशोटी हा 19.5 किमीचा रस्ता वाहनांसाठी सोयीस्कर आहे. त्यानंतर 8.5 किमीचा ट्रेक आहे या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबद्दल प्राथमिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, चशोटी भागात ढगफुटी झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले, की प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले असून बचाव पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत. या घटनेनंतर नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी किश्तवाडचे डीसी पंकज कुमार शर्मा यांच्याशी, तसेच त्यांनी स्थानिक आमदार आणि जम्मू- काश्मीरच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते सुनील कुमार शर्मा यांच्याशी देखील याबद्दल चर्चा केल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.  एनडीआरएफ पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक परिस्थितीत जम्मू- काश्मीरच्या जनतेसोबत ठामपणे उभे आहोत, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

*राष्ट्रपती मुर्मूंनी व्यक्त केल्या संवेदना–जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटीच्या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मी शोकाकूल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करते आणि त्यांना मदत आणि बचाव कार्यात यश मिळावे अशी प्रार्थना करते, अशी पोस्ट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी एक्सवर केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button