सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

152 मतांनी एकतर्फी विजय

-इंडिया आघाडीच्या रेड्डींचा पराभव
– मते एनडीए 452 इंडिया 300
नवी दिल्ली/ 9 सप्टेंबर  : देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज (ता. 9 सप्टेंबर) झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली, तर राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली. त्यामुळे राधाकृष्णन 152 मतांनी विजयी ठरलेत.
उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सकाळी 10 वाजता सुरू झाले आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले, त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, भाजपा खासदार कंगना राणावत, सपा नेते राम गोपाल यादव, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील मतदान केले.
यावेळी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे 4 राज्यसभा खासदार, बीजू जनता दलाचे 7 राज्यसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दलाचे 3 खासदार (1 लोकसभा + 2 राज्यसभा) मतदानासाठी उपस्थित राहिले नाहीत. एकुण 767 खासदारांनी मतदान केले, त्यापैकी 15 मते अवैध ठरतील, 13 खासदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. त्यांनी सांगितले की, सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली, तर विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.
विजयासाठी अपेक्षित मते 392 होती. राधाकृष्णन यांना त्यापेक्षा 60 मते जास्त मिळालीत.2022 च्या निवडणुकीच्या तुलनेत विरोधकांच्या मतसंख्या 26 टक्क्यांवरून वाढून 40 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
-इंडिया आघाडीची 14 मते फुटली
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयामागे क्रॉस व्होटिंगचा धक्का स्पष्ट दिसून आला. विजयासाठी आवश्यक 392 मतांची मर्यादा ओलांडून एनडीएच्या संख्याबळाच्या पलीकडे 14 मते राधाकृष्णन यांना जास्त मिळाली. या निवडणुकीत 767 खासदारांनी मतदान केले; 15 मते अवैध ठरली तर 13 खासदार अनुपस्थित राहिले. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दावा केला की, ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन खासदारांची मते राधाकृष्णन यांना मिळालीत. ज्यामुळे इंडिया आघाडीतील गट फुटण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
-आरएसएस स्वयंसेवक ते भारताचे उपराष्ट्रपती
भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले सी. पी. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपाचे प्रमुख नेते असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघामधून राजकारणाची सुरुवात केली. ते तामिळनाडूचे माजी खासदार (1998, 1999) आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत. 2023 मध्ये त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्य पाहिले. त्यांनी तामिळनाडूमध्ये नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता विरोधी आंदोलन आणि दहशतवादविरोधी उपाययोजनांवर काम केले. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळत असताना उपराष्टपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने त्यांना उमेदवारी दिली. राधाकृष्णन यांनी आरएसएसचे स्वयंसेवक ते देशाचे उपराष्ट्रपती अशी उल्लेखनीय कारकीर्द साधली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button