सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू
पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले

नवी दिल्ली/17 नोव्हेंबर : सौदी अरेबियामध्ये एक भीषण अपघातात भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सौदी अरेबियातील मक्काहून मदीनाला जाणारी बस डिझेल टँकरला धडकली. उमराह यात्रेसाठी निघालेल्या भारतीयांना घेऊन जाणार्या बसमध्ये 45 जणांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, बसला धडक लागताच आग लागली आणि त्यामध्ये काही जण जळून खाक झाले. स्थानिक अधिकार्यांनी बचावकार्य सुरू केले, पण आगीच्या तीव्रतेमुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली. मृतांमध्ये 18 महिला, 17 पुरुष आणि 10 मुले यांचा समावेश असून अद्याप काही लोकांची ओळख पटलेली नसून पटवली जात आहे. या भीषण अपघातात फक्त एक जण वाचल्याचे समोर आले आहे. मदिनापासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुहरासजवळ भारतीय वेळेनुसार पहाटे 1.30 वाजता हा अपघात झाला. अपघातावेळी अनेक प्रवासी झोपेत होते, त्यामुळे बसने धडक दिल्यानंतर आग लागल्याने त्यांना वाचण्याची शक्यता नव्हती. दरम्यान, सौदी अरेबियातील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. टोल-फ्री क्रमांक 8002440003 आहे. भारतीय दूतावासाने 24 तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. मदिना येथे भारतीय नागरिकांशी संबंधित झालेल्या दुर्घटनेचं वृत्त ऐकून मला खूप दुःख झालं आहे. ज्यांनी आपल्या नातेवाईकांना या दुर्घटनेत गमावलं आहे त्या सर्व कुटुंबांबाबत मी सहवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत ते त्वरित बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. रियादस्थित भारतीय दूतावास व जेद्दाह येथील वाणिज्य दूतावास पीडित कुटुंबांना सर्व प्रकारे मदत करत आहेत. आपले अधिकारी सौदी अरबमधील अधिकार्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांचं या स्थितीवर लक्ष आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले.




