37 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
छत्तीसगडची नक्षलमुक्तीकडे वाटचाल

* 20 महिन्यांत 508 माओवादी मुख्य प्रवाहात
दंतेवाडा/30 नोव्हेंबर – छत्तीसगडमधील नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात आयटीबीपीने निर्णायक यश मिळवले आहे. अबूझमाडच्या दुरागम व घनदाट प्रदेशात महत्त्वपूर्ण तळ स्थापन करून एका वर्षात या दलाने रणनीतिक मोर्चाबांधणी पूर्ण केली. या पावलामुळे नक्षलवाद्यांचा शेवटचा मोठा आंतरराज्य मार्ग बंद झाला असून त्यांच्या हालचालींवर मोठी मर्यादा आली आहे. दरम्यान दंतेवाड्यातही सुरक्षा यंत्रणांनी मोठी बाजी मारली. येथे तब्बल 37 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यापैकी 27 जणांवर एकूण 65 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या घडामोडींमुळे राज्यात नक्षलविरोधी मोहिमेला नवसंजीवनी मिळाली असून उर्वरित उग्रवादी गटांवर मानसिकदृष्ट्या मोठा दबाव निर्माण झाला आहे. समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांत तब्बल 12 महिला सदस्यांचाही समावेश आहे. ही मंडळी पूर्वी अनेक चकमकींमध्ये सक्रिय होती. त्यापैकी काहीजण मार्च 2020 मध्ये मिनपा परिसरातील अरण्यात झालेल्या त्या भीषण चकमकीशी जोडलेले होते, ज्यात 26 जवानांनी प्राणाची आहुती दिली होती आणि जवळपास 20 जवान जखमी झाले होते. 2020 मधील या हल्ल्यात तसेच नंतरच्या नक्षलवादी हिंसाचारात त्यांची मुख्य भूमिका असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. याचपैकी काही नक्षलवादी 2024 मध्ये थूलथूली भागात घडलेल्या चकमकीत देखील सहभागी होते. आता त्यांनी शस्त्रं खाली ठेवत आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारल्याने नक्षल मोर्च्यावर सुरक्षिततेचा तोल अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होते.




