20 जणांचा होरपळून मृत्यू
कुर्नूलमध्ये दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग!

* बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण दुर्घटना
*42 प्रवासी करत होते प्रवास
विजयवाडा /24 ऑक्टोबर – NH 44 म्हणजे बेंगळुरू-हैदराबाद महामार्गावर एका खासगी बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घटनेवेळी बसमध्ये साधारणतः 42 प्रवासी होते. शुक्रवारी (ता. 24 ऑक्टोबर) पहाटे सुमारे 3.30 वाजताच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सची बस NH-44 वर कुर्नूलजवळ आली, तेव्हा तिची एका दुचाकीला धडक झाली आणि दुचाकी बसखाली आली. सुरुवातीला बस चालकाला हा अपघात टळला, असे वाटले, पण क्षणभरात बस पेट घेऊन जळू लागली.
माहितीनुसार, कावेरी ट्रॅव्हल्सची ही बस 42 प्रवाशांना घेऊन बेंगळुरूला जात होती. या धडकेत दुचाकी आणि बसमध्ये जोरदार संघर्ष झाला, ज्यामुळे बसच्या सीएनजी टाकीला दुचाकीचे घर्षण झाले आणि स्फोट झाला. काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण स्लीपर बस असल्यामुळे सर्वांना बाहेर पडता आले नाही. यावेळी 20 प्रवाशांचा जागीच आगेत होरपळून मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले असून, काहींना सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले की, बस एका दुचाकीला धडकली आणि दुचाकी बसखाली अडकली. त्यामुळे ठिणगी पडली असावी आणि आग लागली असावी. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी टीम आगीचे नेमके कारण तपासत आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणे आणि पीडितांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे




