19 लोकांना 5 किमीपर्यंत डंपरने चिरडले

रस्त्यावर निष्प्राण देहांचा खच

* अनेकांचे हातपाय तुटले

* 30 जखमींना कांवटिया रुग्णालयात दाखल

जयपूर/3 नोव्हेंबर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक भीषण रस्ते अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेत एका डंपर चालकानं भरधाव वेगात आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर डंपर सुसाट वेगात पादचार्‍यांना आणि अन्य वाहनांना चिरडत सुटला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात अनियंत्रित झालेला डंपर रस्त्यावर अनेकांना चिरडताना दिसत आहे. अपघात इतका भयंकर होता की अनेक मृतदेह डंपरच्या खाली अडकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना कांवटिया रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शींनी अपघातानंतरची परिस्थिती कथन केली. अपघातानंतर रस्त्यावर आक्रोश सुरु होता. अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावर दिसत होती. डंपरच्या खाली काही दुचाकी अडकल्या होत्या. त्या काढण्यासाठी बराच वेळ गेला.
अनेकांसाठी काळ ठरलेला डंपर मंडी रोडहून आला होता. तो जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेनं जात होता. महामार्गावर जाण्याआधी चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर डंपरनं अनेक वाहनांना धडक दिली. बर्‍याच दुचाकींना चिरडल्यानं रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला. काहींच्या मृतदेहांचे तुकडे रस्त्यावर पसरले. रस्त्यावर कुठे हात, तर कुठे काय, तर कुठे बाकीचे अवयव पसरले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले काही जणदेखील डंपरच्या कचाट्यात सापडले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं दुर्घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरु केलं. अपघातानंतर परिसरात आक्रोश सुरु झाला. मृतांच्या कुटुंबियांनी ट्रॉमा सेंटर गाठलं. रुग्णालयाच्या आवारात कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

संबंधित बातम्या

Back to top button