विद्यानिकेतनच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या पथनाट्याने मने जिंकलीत
संपादक माधव पांडे, अविनाश दुधे, वसुंधरा काशीकर यांची उपस्थिती

अमरावती /6 मार्च : शहरातील रामनगर येथील श्रीविद्यानिकेतन शिक्षण संस्थेद्वारे संचालित, विद्यानिकेतन प्राथमिक शाळेचा 37 वा वार्षिकोत्सव सोहळा नुकताच ’सुयोग मंगल कार्यालय’, रुक्मिणी नगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार श्री. माधव पांडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री. अविनाश दुधे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव सुप्रसिद्ध लेखिका,निवेदिका वसुंधरा काशीकर, मुख्याध्यापिका देशमुख मॅडम व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत 9 सादर केले. याप्रसंगी वसुंधरा काशीकर यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व ग्रामगीता देऊन सत्कार केला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्लास्टिक निर्मूलनावर आधारित ’मले बाजाराला जायचं बाई’ हे पथनाट्य प्रभावीपणे सादर केले. तसेच पहिल्या महिला डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील लघुनटिका आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्त्री-शिक्षणाच्या वारशावर आधारित विविध वेशभूषांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणार्या विद्यार्थ्यांसह श्रीसमर्थ विद्यापीठाच्या परीक्षेत सुवर्ण, रजत व कांस्य पदक मिळवणार्या गुणवंतांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्थेच्या सचिव वसुंधरा काशीकर यांनी पालकांशी संवाद साधताना प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, राष्ट्रप्रेम आणि मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्याचे आवाहन केले. त्यांनी संस्थेचे सहसचिव आ. आल्हाद काशीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’पालक जनगणना’ या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. दुसर्या दिवशी आयोजित पालक सभेत आ. आल्हाद काशीकर यांनी 21 व्या शतकातील आव्हाने पेलणारे सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगत, पालकांना मुलांच्या जडणघडणीत जबाबदारीने वागण्याचा मोलाचा सल्ला दिला. उद्घाटक माधव पांडे व अध्यक्ष अविनाश दुधे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल व शिस्तीबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका योगिनी घोटकर व शितल खांदे यांनी केले. प्रास्ताविक देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन जांभळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मोहोड सरांनी सादर केलेल्या ’पसायदानाने’ झाली. या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका देशमुख व ज्येष्ठ शिक्षिका देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.




