जागतिक महिला दिनी अमरावतीत वैष्णवी महिलांची भक्तिमय पदयात्रा
विश्वशांतीसाठी प्रार्थना

अमरावती /10 मार्च : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमरावतीच्या रस्ते आणि चौकाचौकांतून निघालेल्या भव्य ’वैष्णवी महिला पदयात्रे’ने अवघी अंबा नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली.
इस्कॉन गर्ल्स फोरमच्या वतीने आयोजित या सातव्या वार्षिक पदयात्रेने केवळ भक्तीचा प्रसार केला नाही, तर विश्वशांतीचा उदात्त संदेशही जनमानसात रुजवला. विभागीय आयुक्त मा. श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या या यात्रेत विदर्भासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या हजारो महिलांनी सहभाग नोंदवून स्त्री-शक्तीचे दर्शन घडवले. विभागीय आयुक्त मा. श्वेता सिंघल यांनी भगवान श्रीकृष्ण आणि इस्कॉनचे संस्थापक आचार्य ए.सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या प्रतिमेचे अत्यंत भक्तिभावाने पूजन करून महाआरती केली. त्यानंतर भगवा ध्वज दाखवून या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ’हरे कृष्ण’ महामंत्राचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या तालावर फेर धरणार्या महिलांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते. रॉयल प्लॉट येथील श्री सतीधाम मंदिरापासून सुरू झालेली ही दिंडी जयस्तंभ चौक, शाम चौक, राजकमल चौक आणि गांधी चौक अशा मुख्य मार्गांवरून जात श्री एकविरा देवी व अंबादेवी मंदिरात पोहोचली. या ठिकाणी यात्रेची सांगता होऊन सर्व भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात महिलांच्या शिस्तीने आणि भक्तीने एक वेगळाच दरारा निर्माण केला होता.या भक्ती सोहळ्यात जयभद्रा देवी दासी, रश्मी वानखेडे, श्रावण रुची देवी दासी, सेवा प्रेमी देवी दासी, शुभांगी राधा देवी दासी, वृंदा प्रिया देवी दासी, कोमल मेथानी, तुलसी सेविका देवी दासी, प्राचार्या शर्मा माताजी, कीर्ती देशमुख, डॉ. सोनाली गाजले, प्रिकेषा हरडे, समीक्षा कडू, मानलीला देवी दासी, माधवराणी देवी दासी, चंपकलता देवी दासी, सेवा रुची देवी दासी, अनुराधा लीला देवी दासी, रागिणी गोपी देवी दासी, कमलकांती देवी दासी, कृष्ण गीता देवी दासी, सीता प्रेमी देवी दासी, सरस्वती गोपी देवी दासी, सखी अनुगत देवी दासी, शामल सुंदरी देवी दासी, वृषाली साखरकर, शतरूपा देवी दासी, उपदेशावली देवी दासी, कृष्णा काकडे, राधा काकडे, शुभांगी देशमुख, शोभा देशमुख यांसह अनेक महिला मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.




