अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाने प्रगती करा

प्रभाताई भागवत यांचे प्रतिपादन

* विदर्भ कुंभार समाज सुधार समितीच्या महिला मंडळाचा ‘हुन्नर’ कार्यक्रम उत्साहात

अमरावती /24 फेब्रुवारी : जीवनातील संघर्षात अनेकदा अपयशाचे प्रसंग येतात, मात्र अशा वेळी खचून न जाता प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपण निश्चितच प्रगती साधू शकतो. समाजातील युवक-युवती आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेला ’हुन्नर’ हा उपक्रम त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ देणारा ठरेल, असा प्रेरणादायी संदेश विदर्भ कुंभार समाज सुधार समितीच्या महिला अध्यक्षा प्रभाताई भागवत यांनी दिला. श्री संत गोरोबा काका सांस्कृतिक भवन येथे विदर्भ कुंभार समाज सुधार समिती महिला मंडळाच्या वतीने आयोजित ’हुन्नर 2026’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. या सोहळ्याला समाजातील महिलांची मोठी उपस्थिती होती, ज्यांनी आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या दिमाखदार सोहळ्याच्या व्यासपीठावर अध्यक्षा प्रभाताई भागवत यांच्यासह सौ. निर्मलताई नांदुरकर, सौ. स्वाती बडगुजर, सौ. सरिता खोबरे, सौ. संगीता साळीवकर, सविता कोल्हे, सौ. वैशाली नांदुरकर आणि माधुरी सुधा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाताईंनी आपल्या संवादात स्पष्ट केले की, अशा कार्यक्रमांचा मुख्य उद्देश तरुण पिढीला आणि महिलांना योग्य दिशा व प्रोत्साहन देणे हा आहे. त्यांनी महिलांना स्वतःमधील क्षमता ओळखून ध्येयाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. निर्मलताई नांदुरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला, तर उद्योजिका स्वाती बडगुजर यांनी महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सरिता खोबरे यांनी प्रपंच सांभाळून स्त्रिया कशा प्रकारे प्रगती करू शकतात, यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध स्पर्धा पार पडल्या. नृत्य स्पर्धेच्या लहान गटात अनया इंगोले, तर मोठ्या गटात नेहा सरोदे हिने प्रथम क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत डॉ. प्रज्ञा राऊळकर यांनी बाजी मारली. पाककला (डिश डेकोरेशन) मध्ये जया माहुलकर, पुष्पसज्जेत विद्या जोंधळे, संगीत खुर्चीमध्ये तेजस्वीनी गुजर आणि रांगोळी स्पर्धेत सरिता खोबरे यांनी प्रथम पारितोषिक मिळवले. या स्पर्धांचे परीक्षण माधुरी सुधा, गौरी राठी आणि सरिता खोबरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुषमा काळकर यांनी मानलेल्या आभाराने झाली.

’हुन्नर 2026’ या उपक्रमाने कुंभार समाजातील महिलांच्या कौशल्याला नवी झळाळी दिली आहे. निव्वळ स्पर्धा न राहता, हा सोहळा आत्मविश्वासाचा उत्सव ठरला. घर आणि करिअरचा समतोल साधत महिलांनी उद्योग क्षेत्रात भरारी घ्यावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू यशस्वीरीत्या साध्य झाला असून, समाज परिवर्तनाची ही नांदी ठरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button