तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
चिखली-मेहकर मार्गावर दुर्घटना

बुलढाणा / 4 जून: चिखली-मेहकर रोडवर खैरव फाट्याजवळ आज बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. माल वाहक वाहन (ट्रक), डस्टर कार आणि दुचाकीच्या तिहेरी धडकेत तिघांचा मृत्यू झाला. या भीषण वाहन दुर्घटनेने चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. माहितीनुसार भरधाव ट्रकने डस्टर कारला जबर धडक दिली. याच वेळी दुचाकी या दोन्ही वाहनांमध्ये सापडल्याने तिचा अक्षरशः चुराडा झाला. दुचाकीवर असलेल्या अंदाजे 45 वर्षीय महिला आणि सुमारे 16 वर्षीय युवक यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेला युवकाला उपचारासाठी चिखलीच्या डॉक्टर जवंजाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी वाहनात अडकलेल्या मृतदेह वा गंभीर जखमीस बाहेर काढले.