‘समृद्धी’वर दरोडा! पावणे पाच किलो सोने लंपास
चालकानेच केला घात, महामार्ग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बुलढाणा / 24 ऑगस्ट : समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा गुन्ह्यामुळे चर्चेत आला आहे. खामगावहून मुंबईकडे निघालेल्या व्यापार्याच्या गाडीवर फिल्मी शैलीत दरोडा टाकून तब्बल पावणे पाच किलो सोने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे व्यापार्याचाच चालक या कटात सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, व्यापारी अनिल शेशमल जैन चौधरी हे किया गाडीतून समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत होते. टोलनाका पार झाल्यानंतर चालकाने पोटदुखीचा बहाणा करीत गाडी थांबवण्यास सांगितले. एवढ्यात इनोव्हातून आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी व्यापार्याला चाकूने जखमी केले व मिरची पूड टाकून गाडीतली बॅग हिसकावली. यात पावणे पाच किलो सोने होते. दरोडेखोर मालेगावमार्गे पसार झाले मात्र पुढे गाडी टाकून जंगलात लपल्याचे आढळले. मेहकर पोलीस तपास करत असून नाकेबंदी करण्यात आली आहे.
या घटनेनंतर ‘समृद्धी महामार्ग’ सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इंधन चोरी, गुटखा जप्तीच्या घटना गाजवल्यानंतर आता थेट सोन्याची लूट झाल्याने हा महामार्ग गुन्हेगारांसाठी ‘समृद्धी’ ठरतोय, हीच चर्चा सुरू आहे.




