राष्ट्रवादीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नरेश शेळके
‘स्थानिक’ निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांचा निर्णय

बुलढाणा /29 ऑक्टोबर : बदल होणार बदल होणार, अशा दीर्घ काळापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जिल्हाध्यक्ष बदलला आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी तरुणतुर्क समजले जाणारे नरेश शेळके यांची वर्णी लागली. शरद पवारांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर भाकर फिरविण्याचा हा निर्णय घेतला. यामध्ये पक्षातील दुसर्या फळी तील नेते म्हणून समजल्या जा णार्या शेळ केंना कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. वरकरणी हा ‘साहेबांचा’ वा औपचारिकरित्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा निर्णय असला तरी यामध्ये ‘ताईंचा’ मोठा वाटा असल्याची चर्चा रंगली आहे. एकसंघ राष्ट्रवादीपासूनच खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू, अशी शेळकेंची ओळख. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याची फारशी गंभीर दखल न घेता शेळके यांच्यावर मोठी जवाबदारी टाकण्यात आली. पक्षाचे जिल्ह्यातील मोठे नेते, विदर्भ प्रभारी, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बरोबरीने शेळके यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना सामोरे जावे लागणार आहे.




