अज्ञात वाहनाची धडक, युवकाचा मृत्यु
चांदुर रेल्वे मार्गावर अपघात

अमरावती / 22 मे: अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. हा अपघात अमरावती-चांदुर रेल्वे मार्गावर मालखेड वळनावर मंगळवारी रात्री उशिरा घडला. लोकेश छोटेलाल साहु (30, रा. रतनगंज, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे.
लोकेश साहुचे नातेवाईक वर्धा येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती होते. त्यांना भेटण्यासाठी लोकेश मंगळवारी रात्री एमएच 27, एके 8978 क्रमांकाच्या मोटरसायकलने चांदुर रेल्वे मार्गे वर्धेला जाण्यासाठी एकटाच निघाला होता. दरम्यान चांदूर रेल्वेच्या आधी 5 किलोमीटर अंतरावर मालखेड वळनावर असलेल्या बादल धाब्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चांदुर रेल्वे पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी आरोप अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.