येवद्याच्या आदित्यची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड
पंचक्रोशीत खोवला मानाचा तुरा

ग्रामस्थांकडून करण्यात आला सन्मान
दर्यापूर /1 जून: दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील मुख्याध्यापक विलास हाडोळे यांचे चिरंजीव आदित्य यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली. त्याच्या या यशाने पंचक्रोशीत मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच येवदा येथील आदित्य विलास हाडोळे याने कठीण परिश्रम घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. जिद्द चिकाटी आणि अभ्यासातली सातत्यता यामुळे त्याची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशाने येवदा क्षेत्राच्या पंचक्रोशीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. आदित्यच्या या यशाची दखल राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी घेत त्याचा सन्मान करण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार माजी गटशिक्षणाधिकारी संजय वाघमारे, मनोज पाथरकर, नकुल सोनटक्के, शुभम बायस्कार, पंकज कान्हेरकर, निखिलेश ठाकूर, प्रेमसागार आसरे, शंकर चोरे, निलेश तिवाने, आदित्य जूमळे आदींनी त्याच्या घरी जात आई-वडिलांसह आदित्य याचा सन्मान केला.