तळवेल येथे कृत्रिम बुद्धीमत्ता विषायावर कार्यशाळा
बाबाराव शिक्षण संस्था व मायलिनतर्फे आयोजन

-दोन्ही संस्थांमध्ये एआयसंदर्भात 24 महिन्यांचा करार
अमरावती / 20 मे: बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था, तळवेल आणि मायलिन झेनवर्क्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धीमत्ता या विषायावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि सचिव नरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत मायलिनचे संस्थापक व सीईओ मनोज देशपांडे, नेहा देशपांडे आणि नेहा दरेकर यांनी 52 मुख्याध्यापक व शिक्षकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आय आधारित शिक्षण पद्धतींचे मार्गदर्शन केले.
श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था आपल्या पाच मराठी माध्यम आणि एका इंग्रजी माध्यम शाळांसह ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत आहे. अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाने ही भागीदारी ग्रामीण शिक्षणासाठी सुवर्णसंधी असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने मायलिनसोबत 24 महिन्यांचा करार केला, ज्याची सुरुवात या कार्यशाळेने झाली. शिक्षक हा शिक्षणाचा कणा आहे. आयच्या साधनांद्वारे त्यांना सक्षम करून आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करू, असे राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले. मायलिनचे संस्थापक मनोज देशपांडे म्हणाले, मायलिनचे ध्येय प्रत्येक शिक्षकाच्या हाती एआय तंत्रज्ञान देऊन त्यांना प्रत्येक मुलाच्या गरजांचे अचूक डायग्नोस्टिक करण्यास सक्षम बनवणे आहे. यामुळे शिक्षक पालकांसोबत सहकार्याने मुलांचा सर्वांगीण विकास साध्य करू शकतील. मायलिनची एआय आधारित साधने पाठ नियोजन, मूल्यांकन, गृहपाठ आणि पालक संवादासाठी एकात्मिक व्यासपीठ देतात, ज्यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी आणि वैयक्तिक बनते.
संस्थेतील अनेक शिक्षक तंत्रज्ञानात आधीच अग्रेसर आहेत. शाळेने यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी बेसिक प्रोग्रामिंग उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे मुलांमध्ये तांत्रिक कौशल्ये विकसित होत आहेत. मायलिनच्या एआय आधारित प्रशिक्षणामुळे हे शिक्षक आता कृत्रिम बुद्धिमत्तेतही प्रगत होतील, ज्यामुळे त्यांचे कौशल्य वृद्धिंगत होईल आणि ते परिसरातील इतर शिक्षकांसाठी प्रेरणास्रोत ठरतील. या भागीदारीद्वारे संस्थेच्या शाळांमध्ये एआय आधारित मूल्यांकन आणि वैयक्तिक शिक्षण पद्धती लागू होतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन, विश्लेषणात्मक क्षमता, सर्जनशीलता आणि उच्चस्तरीय कौशल्ये वाढतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टिकोनानुसार, ही योजना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करेल. मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्याचे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. राजाभाऊ देशमुख म्हणाले, मराठी माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करू. स्थानिक संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम ही खरी क्रांती आहे.
राजाभाऊ देशमुख यांनी पालकांना उद्देशून सांगितले, मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना शिकवण्यात अभिमान बाळगा. बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तुमच्या मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. 15 मे 2025 पासून सुरू झालेल्या या प्रवासात सहभागी व्हा आणि तळवेलला शिक्षणाचे आदर्श केंद्र बनवूया. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे संचलन माधुरी देशमुख, प्रास्ताविक विनोद तिरमारे तर आभार प्रदर्शन डॉ. तुषार देशमुख यांनी केले. यावेळी संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. राजाभाऊ देशमुख यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने आणि मायलिनच्या एआय तंत्रज्ञानाने प्रेरित ही भागीदारी ग्रामीण शिक्षणात क्रांती घडवेल आणि तळवेल एआय आधारित शिक्षणाचे प्रादेशिक केंद्र बनून मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा नक्की मिळेल.