कर्जमाफी, नूकसान भरपाईसाठी उबाठा पक्षाची तहसिलवर धडक

अपंग, विधवांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

-शासनाविरोधात घोषणाबाजी, तहसिलदारांना निवेदन
चांदुर बाजार / 23 जून : शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी आणि मे महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे क्षतीग्रस्त संत्रा व कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चांदुर बाजार तहसिल कार्यालयावर धडक देवून आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकार कर्जमाफीचा शब्द फिरवून शेतकर्‍यांची फसवणूक करित असल्याचा आरोप यावेळी उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपीटमुळे तालुक्यात संत्रा आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. त्याची नूकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करुन खरिप हंगामाच्या तोंडावर भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रखडलेले मानधन मिळावे, दिव्यांग व विधवांना अंत्योदय (35 किलो धाण्याचे) राशन कार्ड देण्यात यावे, यशवंतराव चव्हाण व शबरी आवास योजनेत लाभार्थ्यांना मंजूर घरकुलांचा टप्पा वितरीत करावा, लाडक्या बहिणीला 2100 रुपये कुठलेही निकष न लावता सरसगट देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी शिवसेना उबाठाच्यावतीने करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार रामदास शेळके यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
तालुका पातळीवरील मागण्या पूर्ण करण्यासाठी आठ दिवसात तालुक्यातील प्रत्येक मंडळात कॅम्प आयोजित करणार असल्याचे यावेळी तहसिलदारांनी सांगितले. ज्या लोकांचे अंगठे व डोळे स्कॅन होत नाही अशा लोकांची कागदपत्रे जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल आणि अन्य प्रश्न बैठकीद्वारे निकाली काढू असे आश्वासन तहसिलदारांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, उपजिल्हा प्रमुख आशिष वाटाने, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निर्मला कौढन्यपुरे, तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवासेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे, शहर प्रमुख शुभम सपाटे, अनिल सायंदे, पवन राऊत, दादाराव तायडे, ऋषिकेश रडके, विक्रम फुकट, मंगेश सापधरे, देवेंद्र औतकर, मनीष राठी, शंकरराव भेटाळू, कुशल भेटाळू, सुरेश काकडे, संजय ठाकरे, आशिब शाह, पप्पू बावणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला, शेतकरी, अपंग व विधवा महिला उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button