2.8 लाखांच्या जबरी चोरी प्रकरणात दोघे जेरबंद
पथ्रोट ठाण्याच्या हद्दीतील घटना

-ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती / 28 मे: फायनान्स कंपनीच्या अधिकार्यांजवळची 2 लाख 8 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढणार्या दोन चोरट्यांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत परसापूर येथे ही जबरी चोरीची घटना 21 मे रोजी घडली होती. लुकेश नुतनराव दोड (25, रा. योगीराज कॉलनी, पोटे टाउनशिपजवळ, अमरावती) आणि विपुल गोविंदराव जवंजाळ (30, रा. वार्ड क्र. 2 धनेगाव, अंजनगाव सुर्जी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात सत्यम रविदास सोनवणे (20, रा. कांडली, परतवाडा) यांनी पथ्रोट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारत फायनान्स इनक्लुजन लि. या कंपनीत सत्यम असिस्टंट मॅनेजर आहे. सत्यम आणि त्यांचा सहकारी साहिल कदम हे मोटरसायकलने आरेगाव व खांजमानगर येथे महिला बचत गटाच्या बैठकीसाठी गेले होते. तेथे त्यांनी 4 बैठका घेउन बचत गटाचे एकुण 2 लाख 8 हजार रुपये वसुली केले. ही रक्कम एका बॅगमध्ये ठेवून ते पल्सर मोटरसायकलने परतवाडा शहराच्या दिशेने येत असताना परसापूर येथे एकलव्य शाळेजवळ मागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले. त्यांनी सुरुवातीला फोन नंबर लिहीन्यासाठी त्यांना पेन मागितला. नंतर एकाने सत्यम यांच्या मोटरसायकलजवळ येउन गाडीची चाबी काढली. त्यानंतर त्यांच्या हातातील रोख रक्कम असलेली बॅग दमदाटी करुन जबरदस्तीने हिसकावून घेतली व आपल्या दुचाकीने दोघांनीही तेथून पळ काढला.
याप्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पथ्रोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. ग्रामीण गुन्हे शाखेलाही या प्रकरणाच्या समांतर तपासाचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान या घटनेत मुळ वरुडच्या वडाळा येथील रहिवासी असलेल्या लुकेश दोड व त्याच्या साथीदाराचा हात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तो सध्या अमरावती येथे पोटे टाउनशिप परिसरातील योगीराज कॉलनी येथे रत्ना मोहोकार यांच्या घरी राहत असल्याचेही समजले. त्यावरुन गुन्हे शाखेने आधी लुकेशला अमरावतीहून ताब्यात घेतले आणि नंतर त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचा साथीदार विपुल जवंजाळ यालाही अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दोन्ही आरोपींकडून चोरीतील 1 लाख 43 हजार रुपये रोख, तीन मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली एमएच 27 / डीएन 0108 क्रमांकाची होन्डा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकुण 2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक नितीन इंगोले, पोलिस कर्मचारी सुनील महात्मे, सैय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगोरे, चेतन दुबे, हर्षद घुसे यांच्या पथकाने केली. त्यांना सायबर शाखेचे सागर धापड, शिवा शिरसाठ, रितेश गोस्वामी, विकास अंजीकर यांचे सहकार्य लाभले.