जबरी चोरी प्रकरणात दोन आरोपी गजाआड

2 गुन्ह्यांची कबुली, गुन्हे शाखा-2 ची कारवाई

अमरावती / 20 मे: 4 मे रोजी बियाणी महाविद्यालय परिसरातील शिवाजी मार्केटसमोर पायदळ जात असलेल्या एका इसमाला दोन मोटरसायकलस्वारांनी लुटल्याची घटना घडली होती. या जबरी चोरी प्रकरणात अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांनी या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यांची कबुली पोलिसांजवळ दिली आहे.
केशव महेश नारायणी (19, रा. मधूसूदन कॉलनी, अमरावती) आणि संजय श्रावण खिची (20, दसरा मैदान मंदिरामागे, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेते. प्राप्त माहितीनुसार मानकलाल सोमानी यांनी 4 मे रोजी यासंदर्भात राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बियाणी कॉलेजसमोरुन जात असताना शिवाजी मार्केटजवळ मोटरसायकलवरुन आलेल्या दोन युवकांनी आपल्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकण्याचा प्रयत्न केला. आपण प्रतिकार केला तेव्हा या युवकांनी आपल्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढल्याचे सोमानी यांनी तक्रारीत म्हटले होते.
याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. सोबतच याप्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट – 2 कडूनही करण्यात येत होता. दरम्यान या घटनेत केशव नारायणी आणि संजय खिची या युवकांचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन गुन्हे शाखेने दोघांनाही ताब्यात घेउन त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यासह राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटलेल्या दुसर्‍या लुटपाटीच्या गुन्ह्यातही त्यांचाच हात असल्याचे त्यांनी कबुल केले. आरोपींकडून पोलिसांनी 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त कल्पना बारवकर, उपायुक्त सागर पाईल, सहाय्यक पोलिस निरिक्षक बाबाराव अवचार, उपनिरिक्षक संजय वानखडे, अंमलदार महेंद्र येवतीकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, योगेश पवार, विशाल वाकपांजर, संदीप खंडारे, चेतन चर्मा, राहुल दुधे यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button