चांदूरबाजार आणि अचलपूरमध्ये हजारो झाडांची अवैध कत्तल

जिल्ह्यात वनविभाग कुंभकर्णी झोपेत

-अधिकार्‍यांची निष्क्रियता, वृक्षप्रमींमध्ये संताप
परतवाडा / 20 मे: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर उपविभागातील चांदूरबाजार आणि अचलपूर तालुक्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू आहे. साग, बांबू आणि इतर मौल्यवान वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, त्यामुळे पर्यावरणाचा मोठा र्‍हास होत आहे. विशेष म्हणजे, या सगळ्या प्रकाराकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचा आरोप केला जात असून या प्रकाराने वृक्ष व पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे वेळोवेळी यासंदर्भात लेखी आणि तोंडी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, आजतागायत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. एका नागरिकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले, आरएफओला सर्व अवैध कृत्यांची माहिती आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांची पाठराखण असल्यामुळे कोणीही कारवाई करत नाही. तक्रारकर्ता संतोष भालेराव यांना सुद्धा अनुकूल उत्तर गेल्या दोन महिन्यात वनविभागाने दिले नसून त्यांनी शेवटी तक्रार पीसीसीएफ नागपूर येथे केलेली आहे.
पर्यावरण मित्र योगेश खानझोडे यांनीही यासंदर्भात डीएफओ पाटील यांना विचारणा केली आहे. तालुक्यातील हजारो वृक्षांची अवैध कत्तल, नष्ट झालेले उपातखेडा गार्डन, वाघडोह, गोंदवाघोळी येथील 16 हजार रोपटे मृत्यू प्रकरण, अचलपूर-सिंधी रोडवरील 27 झाडे यांसदर्भात त्यांनी उपवनसंरक्षक पाटील यांच्याकडे प्रश्न उपस्थित केले. तेव्हा त्यांनी सुद्धा उडवा उडवीचे उत्तर दिल्याचे खानझोडे यांचे म्हणणे आहे. उपवनसंरक्षक जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागला दोष देवून जबाबदारी झटकत असल्याचे त्यांनी सांगितले.
राधेलाल कारले यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यांना सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास परतवाडा कार्यालयात आरएफओ वाळके यांनी बोलाविले आणि कोरे कागदावर सही करण्यास सांगितले. तसेच कारले यांना दहा हजार रुपयांचे पाकिट देऊन तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही वृक्षतोड लाकूड माफिया आणि वन विभागातील काही अधिकार्‍यांच्या संगनमताने सुरू असून, यामागे कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार दडलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जंगलक्षेत्र उजाड होत असून जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या अवैध वृक्षतोडीची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषी आरएफओ आणि संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, प्रभावी वृक्षारोपण मोहीम हाती घ्यावी, वनसंवर्धनासाठी पारदर्शक व जबाबदार प्रशासनाची स्थापना करावी अशी मागणी तालुक्यातील पर्यावरण व वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर वनविभागाकडे विचारणा केल्यावर त्यांनी कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संयम सुटत असून, त्यांनी आता सोशल मीडियावर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. वनविभागंच जर जंगल वाचवणार नसेल, तर आम्ही कुणाकडे जायचं? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
-जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न
ब्राह्मणवाडा ते शिरजगाव रोड परिसरात झाडांची अवैध कत्तल होत असताना वनविभागाने ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ढकलली आहे. वन अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, सदर झाडे बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. त्यांनी बांधकाम विभागाला पत्र पाठवले आहे. दुसरीकडे मात्र, उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांनी पत्र मिळाल्याचे सांगितले मात्र अजूनही कुठलीही कारवाई त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. हा जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकारही सुरु आहे.
-ईसापूर व सिंधी मार्गावरही झाडांची कत्तल
पर्यावरणप्रेमी योगेश खानझोडे आणि तक्रारदार गौतम खंडारे यांनी माहिती दिली की, ईसापूर येथे 88 व अचलपूर-सिंधी रोडवर 27 झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत. 2018 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात वृक्षतोडीच्या कारवाईचे अधिकार वनविभागाकडे आहेत. तरीही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button