धक्का लागताच पडली शक्कर तलावाची रेलिंग

दोन आदिवासी भाविक जखमी

-काम निकृष्ठ दर्जाचे, अपघाताची शक्यता
-चिखलदर्‍यात पर्यटकांचा जीव धोक्यात
अमरावती / 14 मे: देवी पॉईंट आणि शक्कर तलाव या चिखलदर्‍यातील वर्दळीच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांपूर्वी रेलिंगचे निर्माण करण्यात आले होते. पण अल्पावधीतच निकृष्ठ बांधकामामुळे या रेलिंगची दुर्दशा झाली आहे. धक्का लागताच ही रेलिंग कोसळत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यातून पर्यटकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. अशाच प्रकारातून देवी पॉईंट येथे दर्शनासाठी आलेले दोन आदिवासी भाविक रेलिंग तुटून जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.
चिखलदरा येथे पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. शक्कर तलाव आणि देवी पॉईंट ही पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रे आहेत. येथे बोटिंगची व्यवस्था आहे. देवी पॉईंट येथील मंदिर आदिवासींचे श्रद्धास्थान असल्याने येथे भाविकांची गर्दी असते. या ठिकाणांचे जलसंपदा विभागामार्फत दीड ते दोन वर्षापूर्वी सौंदर्यिकरण करण्यात आले. त्यावेळी तलावाचे नूतनीकरण, खोलीकरण तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तलावाच्या रेलिंगचे काम करण्यात आले होते. यापैकी तलावाच्या रेलिंगचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आता दिसून येत आहे. हात लावला की ही रेलिंग पडत असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. मंगळवारी देवी पॉईंटवर आलेल्या दर्शनासाठी आदिवासी बांधवांची गर्दी होती. त्यापैकी रेलिंगचा आधार घेउन जात असलेल्या दोन आदिवासींचा धक्का लागताच रेलिंग तुटून पडली आणि दोघेही जखमी झाले. या प्रकारानंतर या चिखलदरातील या महत्वाच्य पर्यटन स्थळावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुढे पावसाळा असून त्यावेळी याठिकाणी पर्यटक व भाविकांची गर्दी अधिक असते. तलावाच्या काठाने चालताना पर्यटकांना रेलिंगचा आधार घ्यावाच लागतो. पण ही रेलिंगच क्षतीग्रस्त असल्याचे मंगळवारच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यातून एखादी मोठी विपरित घटना घडू शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रेलिंगची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या कामावर सिडको व जलसंपदा विभागामार्फत एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतरही कामाचा दर्जा राखला गेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यात मोठा आर्थिक घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत असून याची चौकशी करावी आणि दोषी आढळणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. याबाबत अचलपूर येथील जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता सचिन पाल यांना विचारणा करण्यात आली असता, माहिती घेउन कार्यवाही करणार असल्याचे ते म्हणाले.

मी आज फिरण्यासाठी शंकर तलावाकडे गेलो असता, तेथे दोन व्यक्ती रेलिंग पकडून उभे होते. अचानक रेलिंग तुटले आणि त दोघेही पडले. त्यात ते जखमी झालेत. रेलिंगचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येथे मोठा अपघात घडू शकतो. असे सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव नाईक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button