जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांची दुर्दशा

दुरुस्तीसाठी निधी द्या, शिक्षक समितीची मागणी

-सीईओ व शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन
अमरावती / 14 मे: अमरावती जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे आगामी सत्रात पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होवून त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे या वर्गखोल्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा आणि दुरुस्तीचे काम सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्यावतीने आज बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.
अमरावती जिल्हा परीषद शाळेच्या शिकस्त वर्ग खोल्यांची दुरस्ती करणे आवश्यक आहे. या अगोदर समग्र शिक्षा अभियान मधुन वर्ग खोल्या दुरस्तीकरीता निधी मिळत होता. पण तो निधी येणे बंद झाला आहे. याकरीता जिल्हा नियोजन मधून निधी मिळतो, पण अद्याप यंदा दुरुस्ती करीता निधी मंजुर झाला नाही. अमरावती जिल्ह्यातील 100 वर्ग खोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तेव्हा या कामाकरिता जिल्हा परीषदेकडून पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-2026 ची सुरुवात 23 जुन 2025 पासुन होणार आहे. पाऊस सुरु झाल्यास वर्ग खोल्यांची दुरुस्ती होउ शकणार नाही. त्यामुळे संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची, वर्ग भरविण्याची अडचण निर्माण होईल. तसेच अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. असे नमूद करण्यात आले आहे. दुरुस्ती संबंधिचे प्रस्ताव शाळांनी जिल्हा परिषदेकडे सादर केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार, सरचिटणीस शैलेश दहातोंडे, गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे, कार्याध्यक्ष प्रशांत निमकर, कोषाध्यक्ष नंदकीशोर पाटिल, कार्यालय सचिव मनिष काळे, राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर, महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे, महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे, सरचिटणीस विनिता घुलक्षे, कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, कोषाध्यक्ष भावणा ठाकरे, जुनी पेन्शन आघाडी प्रमुख आल्हाद तराळ, सरचिटणीस प्रेमसुख ठोंबरे, कार्याध्यक्ष निलेश कांडलकर, कोषाध्यक्ष पंकज दहीकरसह आदी उपस्थित होते.

-सावित्रिबाई फुले योजना सुरु करा
सध्या बंद व गरजू विद्यार्थीनींसाठी हितावह असलेली सावित्रीमाई फुले दत्तक पालक योजना पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली. शिक्षक, शिक्षणप्रेमी यांच्या पुढाकाराने स्वतः निधी जमा करुन जिल्हा परिषद शाळेतील अनाथ, गरजु मुलीना दरवर्षी प्रथम 300 रुपये व 500 रुपये याप्रमाणे जिल्हातील प्रत्येक शाळेच्या एका मुलीला शिष्यवृत्ती देण्यात येत होती. परंतु काही वर्षापासुन या योजनेचा लाभ मुलींना मिळाला नाही. हा निधी महाराष्ट्र बैंक शाखा गाडगेनगर व शिक्षक सहकारी बँक अमरावती येथे मुदत ठेवीमध्ये रक्कम ठेवण्यात आला आहे. दरवर्षी या ठेवीवर मिळणार्‍या व्याजावर ही योजना सुरु होती. पण शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या व संबंधीत शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या वेळकाढू धोरणामुळे ही योजना बंद आहे. असे निवेदनात म्हटले आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या हितास्तव ही योजना तात्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button