गर्भवती असलेल्या अल्पवयीन युवतीची आत्महत्या

अल्पवयीन युवकावर दुष्कृत्याचा आरोप

-गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती / 30 मे: एका 16 वर्षीय अल्पवयीन युवतीने आपल्या राहत्या घरी बाथरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदनाच्या अहवालातून मृतक युवती 1 महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी मृतक युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गाडगेनगर पोलिसांनी शेजारीच राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन युवकावर दुष्कृत्य करुन युवतीला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मृतक अल्पवयीन युवतीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार या 16 वर्षीय युवतीला शेजारीच राहणारा 17 वर्षीय अल्पवयीन युवक त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. त्यावरुन त्यांच्यात वादही सुरु होता. युवतीने घरी याबाबत सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी युवकाच्या पालकांशी चर्चा केली आणि युवकालाही समज दिली होती. अशातच 28 मे रोजी घरात कोणीच नसताना या युवतीने बाथरुमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आई-वडिल सायंकाळी घरी परतले तेव्हा ही घटना उघडकीस आली.
सूचना मिळाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. आज युवतीच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. त्यात मृतक युवती ही एक महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. मृतक युवतीच्या आईने पोलिसांत शेजारच्या अल्पवयीन युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानेच आपल्या मुलीवर दुष्कृत्य केल्याने ती गर्भवती राहीली आणि त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button