धावण्याची शिक्षा आणि अमरावतीच्या प्रशिक्षणार्थी पोलिसाचा मृत्यु

धुळे प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना

-पळत असतानाच हृदयविकाराचा झटका
-घटनेनंतर प्रशिक्षाणीर्थींमध्ये उद्रेक
अमरावती / 28 मे: धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणार्‍या अमरावती जिल्ह्यातील रहिवासी 42 वर्षीय पंकज लक्ष्मणराव घावट यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंकज घावट हे अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा नजीकच्या सावळापूर येथील रहिवासी होते. ते माजी सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांचं प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पंकज घावट धावत असताना हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना कुठल्यातरी चुकीमुळं शिक्षा म्हणून ग्राउंडवर धावण्यासाठी सांगितलं होतं आणि धावतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी घावट यांना मृत घोषित केलं, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर धुळ्याच्या या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी एकत्र येऊन मोठा उद्रेक झाला असल्याची माहितीही पुढे आली असून त्यामुळं ही घटना मोठ्या संशयाचं कारण ठरत आहे.
प्रसार माध्यमांना त्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी मज्जाव करण्यात आला असल्याचेही समजते. प्रशिक्षणार्थ्यांनी पत्रकारांना आत येण्यासाठी विनंती केली. परंतु, या ठिकाणी गेटवरच अडवण्यात आले. त्याचं कारण काय ते समजलं नाही. त्यानंतर काही वेळात या ठिकाणी अधिकारी विजय पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की, पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे पंकज घावट (वय 42) हे चेस्ट नंबर 609 अमरावतीचे रहिवासी असून 8 महिन्यापासून प्रशिक्षण सुरू होतं. धुळे प्रशिक्षण केंद्रात आज सकाळी ग्राउंड सुरू असताना गेटजवळ आल्यावर त्यांना त्रास सुरू झाला आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे त्याचा मुत्यू झाला.

-मृत्यूचं नेमकं कारण काय?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे समादेशक विजय पवार यांनी सांगितलं की, पंकज घावट हे रोज नियमितप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सराव करत असताना, त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. ही बाब त्यांच्या काही जवळच्या मित्रांना कळतात त्यांनी त्यांना तत्काळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात आणलं. डॉक्टरांनी त्यांना तपासलं असता, त्यांचा मृत्यु झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पंकज घावट हे सध्या धुळे पीटीसीमध्ये प्रशिक्षण घेत होते. मात्र, प्रशिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण जरी कळलं नसलं तरी मात्र, हा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं झाल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button