पोलिस आयुक्त अरविंद चावरियांनी पदभार स्विकारला

आयुक्तालयातर्फे सलामी व स्वागत

अमरावती / 20 मे: अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. अमरावतीत आगमन झाल्यानंतर आयुक्तालयातील पोलिस अधिकार्‍यांनी त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. पोलिस पथकाच्यावतीने त्यांना सलामी देण्यात आली.
नविनचंद्र रेड्डी यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर अमरावतीच्या पोलिस आयुक्तपदी राज्याच्या गृहखात्याने अरविंद चावरिया यांची नियुक्ती केली आहे. अमरावतीला येण्यापूर्वी ते पुणे येथे अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत होते. आज दुपारी अरविंद चावरिया यांचे वसंत हॉल येथे आगमन झाले. यावेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील आणि कल्पना बारवकर यांची त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी तिन्ही उपायुक्तांशी चावरिया यांनी चर्चा केली. त्यानंतर अरविंद चावरिया हे शहर पोलिस मुख्यालयात पोहोचले. तेथेही अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी चावरिया यांना पोलिस पथकातर्फे सलामी देण्यात आली.
त्यानंतर आपल्या कक्षात पोलिस उपायुक्त व प्रभारी पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांच्याकडून अरविंद चावरिया यांनी पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. अमरावती विभागात आपण पूर्वी बुलढाणा येथे पोलिस अधीक्षक म्हणून दोन वर्ष कार्यरत होतो. तेव्हा पोलिस महासंचालक कार्यालयात बैठकीनिमित्त अमरावतीला येणे व्हायचे, असे अरविंद चावरिया यांनी सांगितले. याप्रसंगी उपायुक्त सागर पाटील, कल्पना बारवकर यांच्यासह सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस ठाण्यांतील व विविध सेलचे निरिक्षक व अन्य अधिकारी उपस्थित होते.

-गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याला प्राधान्य
आज पदभार स्विकारला आहे. सुरुवातीला अमरावती शहराची संपूर्ण माहिती घेउन येथील परिस्थिती समजून घेणार आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे याला आपली प्राथमिकता राहणार असून त्यासाठी आवश्यक ती पावले आपण उचलणार असल्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button