गृहकर्ज फेडण्याच्या विवंचनेत वृद्धाची आत्महत्या

मोर्शीनजीक पाळा येथील घटना

मोर्शी / 16 जुलै : घर बांधकामासाठी एका खाजगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, याच विवंचनेत एका 65 वर्षीय वृद्धाने आपल्या त्याच निर्माणाधीन घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मोर्शी लगत श्रीक्षेत्र पाळा येथे उघडकीस आली. मृतक वृद्ध इसमाचे नाव मनोहर फत्तुजी डबराशे असे आहे. आज बुधवार, 16 जुलै रोजी सकाळी 6 वाजता पिल्लरला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावलेल्या स्थितीत मनोहर डबराशे मृतावस्थेत आढळून आले.
प्राप्त माहितीनुसार पाळा येथील मनोहर फत्तुजी डबराशे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. घर बांधकामासाठी डबराशे यांनी एका खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. आर्थिक परिस्थितीमुळे कर्ज घेतल्यापासूनच त्यांना परतफेडीची चिंता भेडसावत होती. ते कोणाशीही बोलत नव्हते. कर्जाच्या विवंचनेत राहत होते. नेहमीप्रमाणे आज 16 जुलै रोजी सकाळी पाच वाजता उठून चहापाणी घेतल्यानंतर शेजारी बांधकाम सुरु असलेल्या घरी गेले. तेथे पिल्लरच्या सळाखीला नायलॉनची दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला व आत्महत्या केली.
काही वेळाने मनोहर डबराशे यांचा मुलगा सिद्धार्थ यांना हा प्रकार दिसला. त्यानंतर मोर्शी पोलीसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मनोहर डबराशे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालात पाठविण्यात आला. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास आरंभीला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button