लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन युवतीला गर्भधारणा
आरोपीवर बाल अत्याचाराचा गुन्हा

चिखलदरा / 5 जून: परिचयातील एका 16 वर्षीय युवतीला प्रेमजाळ्यात अडकवून व तिला लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय युवकाने तिचे सतत दीड वर्ष लैंगिक शोषण केले. त्यातून या युवतीला गर्भधारणा झाल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर चिखलदरा पोलिसांनी आरोपी युवकावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल बाबूराव जामुनकर (रा. खडीमल, ता. चिखलदरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी राहुल जामुनकर व पिडिता हे एकमेकांचे परिचित आहे. राहुलचे पिडितेच्या घरी नेहमीच जाणे-येणे होते. अशातच राहुलने पिडितेला आपल्या प्रेम जाळ्यात अडकविले आणि लग्नाचे आमिष दाखवून त्याने युवतीशी लैंगिक संबंध स्थापित केले. ऑक्टोबर 2023 पासून युवतीच्या घरी तसेच अन्य ठिकाणी राहुलने सतत दीड वर्ष तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान काही दिवसांपूर्वी युवतीला या संबंधातून गर्भधारणा झाल्याची बाब समोर आली आणि राहुलचे बिंग फुटले. युवतीच्या कुटुबियांना याची माहिती झाल्यानंतर त्यांनी युवतीला चिखलदरा पोलिस ठाण्यात नेले. तेथे युवतीने राहुल जामुनकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी राहुलवर पोस्को अर्थात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटकही केली.




