अमरावतीच्या आठवणी सदैव हृदयात राहतील

नविनचंद्र रेड्डी झाले भावूक

-आयुक्तालयातर्फे समारंभपूर्वक निरोप
अमरावती / 16 मे: अमरावतीत 2 वर्ष पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर नविनचंद्र रेड्डी यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यानिमित्त अमरावती पोलिस आयुक्तालयाच्यावतीने मावळते पोलिस आयुक्त नवनिचंद्र रेड्डी यांना एका समारंभाव भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नविनचंद्र रेड्डी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अमरावती शहरात सेवा देताना घालविलेल्या क्षणांच्या आठवणी सदैव हृदयात घर करु राहतील, असे उद्गार काढून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी पोलिस खात्यातील सहकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबतच सर्वसामान्य अमरावतीकरांनी आपल्याला सहकार्य केल्याचे सांगून नविनचंद्र रेड्डी यांनी त्याबद्दल सर्वांचे आभार मानलेत. यापुढेही शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी शहरवासी असाच पुढाकार घेत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निरोप समारंभाला अमरावतीचे प्रभारी पोलिस आयुक्त व उपायुक्त गणेश शिंदे, डीसीपी कल्पना बारवकर, सागर पाटील, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्यासह नविनचंद्र रेड्डी यांचे कुटुंबिय तसेच अमरावती पोलिस आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम पोलिस आयुक्तालयाच्यावतीने नविनचंद्र रेड्डी यांना सलामी देण्यात आली. पोसि विभागाच्यावतीने त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी डीसीपी गणेश शिंदे, सागर पाटील व कल्पना बारवकर यांनी मनोगतातून नविनचंद्र रेड्डी यांच्यासोबत काम करताना आलेले अनूभव कथन केले. काही गणमान्य नागरिकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी रेड्डी यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Back to top button