चांदुर रेल्वेच्या घरफोडी प्रकरणात पती-पत्नी गजाआड
पुलगाव बसस्थानकाहून अटक

-सोने खरेदी करणारा सराफही ताब्यात
-ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती / 22 मे: चांदुर रेल्वे येथे जालान ले-आउट परिसरात 8 मार्च रोजी दिवसाढवळ्या घडलेल्या 4 लाख 80 हजार रुपयांच्या घरफोडी प्रकरणात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पती-पत्नीला गजाआड केले आहे. याप्रकरणातील चोरीचे सोने खरेदी करणार्या सराफा व्यावसायिकालाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी पती-पत्नीने चांदुर रेल्वेसह धामणगाव रेल्वे, मोझरी, दर्यापूर येथील 5 घरफोडीच्या घटनांमध्ये त्यांचा हात असल्याचे पोलिसांसमोर कबुल केले आहे.
शेख नसीम शेख सलिम (40) आणि सीमा उर्फ हेमा परवीन शेख नसीम (45, दोघेही रा. सादिया नगर, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पती-पत्नींची नावे आहेत. तर प्रफुल्ल सुधाकर पाठक (44, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) या सोनारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
चांदुर रेल्वे येथे जालान ले-आउटमध्ये राहणार्या एका महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्या कुटुंबासह घराला कुलुप लावून बाहेरगावी गेल्या असताना 8 मार्चच्या मध्यरात्री त्यांच्या घरी ही चोरीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून सोन्या-चांदीचे दागीणे आणि रोख रक्कम असा एकुण 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐजव चोरुन नेला होता. याप्रकरणात चांदुर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. गुुन्हे शाखेच्या पथकाने चांदूर रेल्वे उपविभागातील सराईत चोरट्यांची यादी तयार केली.
दरम्यान चांदुर रेल्वे जालान ले-आउटमधील चोरी प्रकरणात शेख नसीम आणि त्याची पत्नी सीमा उर्फ हेमा परवीन यांचा हात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. हे दोघे मुळ अमरावती येथून रहिवासी असून सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास असल्याचेही समजले. पोलिसांनी लगेच त्यांच्यावर लक्ष केंद्रित करुन त्यांचा शोध सुरु केला. दरम्यान आज हे दोघे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ पुलगाव गाठले आणि बसस्थानक परिसरातून दोघांनाही ताब्यात घेतले.
दोघांचीही पोलिसांनी कसुन चौकशी केली असता त्यांनी चांदुर रेल्वेतील घरफोडी आपणच केल्याचे कबुल केले. या घटनेत चोरी केलेले सोन्याचे दागीणे अमरावती सराफा बाजारातील सराफा व्यावसायिक प्रफुल्ल पाठक याला 2 लाख 91 हजार रुपयांत विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी प्रफुल्ल पाठक यालाही अमरावती येथून अटक केली. तिन्ही आरोपींन पुढील तपासासाठी चांदुर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
-5 गुन्ह्यांची दिली कबुली
शेख नसीम आणि त्याची पत्नी सीमा उर्फ हेमा परवीन यांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी चांदुर रेल्वेच्या घटनेसह अमरावती जिल्ह्यातील आणखी 5 गुन्ह्यांमध्ये आपला हात असल्याचे कबुल केले. चांदूर रेल्वेतील 2 तसेच मोझरी, दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे येथील प्रत्येक एका घरफोडीच्या घटनेची त्यांनी कबुली दिली. ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात तसेच ग्रामीण गुन्हे शाखेचे निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय मोहम्मद तसलीम व मूलचंद भांबूरकर व पोलिस कर्मचारी अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजिया व चालक संजय प्रधान यांच्या पथकाने ही कारवाई केली.