मोर्शीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाउस
वीज पडून गाय मृत्युमुखी

-शेतकर्यांचे प्रचंड नूकसान
मोर्शी / 20 मे: मोर्शी तालुक्यात सोमवारी रात्री उशिरा विजेचा कडकडाटासह मुसळधार व वादळी पावसाने थैमान घातले. या पावसाचा तालुक्यातील अनेक भागात शेतकर्यांना मोठा फटका बसला असून त्यांचे प्रचंड नूकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून एक गाय सुद्धा मृत्युमुखी पडली. 19 मे रोजी संध्याकाळी 8 वाजता मोर्शी शहरासह तालुक्यात विजेच्या कडकटाक्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. आकाशात चमकणार्या वीजा आणि ढगांचा गडगडट यामुळे नागरिक अक्षरश: भयभीत झाले होते.
मोर्शी येथून जवळच असलेल्या सुपाडा शेत शिवारात मोहन ढवळे यांच्या शेतात बांधलेल्या गाईच्या अंगावर वजी कोसळून गाईचा जागीच मृत्यू झाला. वीजेमुळे काही झाडांचेही नूकसान झाले. याबाबतची तक्रार शेतकरी मोहन ढवळे यांनी तहसीलदार विनोद वानखडे यांचेकडे केली. त्यांनी तात्काळ पटवारी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. तालुक्यातील घोडदेव, सालबर्डी, पाळा, डोंगर यावली, दापोरी, हिवरखेड, मायवाडी, भाईपूर यासह परिसरात अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकर्यांना चांगलाच फटका बसला. त्यांचा आंबिया व मृग बहाराच्या संत्राचे व संत्रा झाडांचे नुकसान झाले. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून मोर्शी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अस्मानी संकटाने संत्रा उत्पादक शेतकर्यांच्या आयुष्याची घडी विसकटून टाकली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने संत्रा उत्पादक शेतकर्यांना तात्काळ मदत जाहीर करून आधार देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे मृग बहराच्या संत्रा झाडांचा ताण तुटला त्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकर्यांच्या मृग बहराचे कधीही भरून न निघणारे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदाच्या वर्षात मृगाच्या पावसाच्या संततधार पावसामुळे मृग बहरला असता परंतु मे महिन्यात म्हणजेच मृग नक्षत्रापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.