महावितरणच्या अनागोंदीविरोधात धामणगाववासी संतप्त
काँग्रेसने भेट दिले बेशरमचे झाड

-ढिसाळ कारभाराचा निषेध, कार्यालयात ठिय्या
धामणगाव रेल्वे / 22 मे : धामणगाव रेल्वे शहरात मागील एक महिन्यापासून महावितरणचा अनागोंदी कारभार सुरु असल्याने त्याचा प्रचंड मनस्ताप शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. परिणामी महावितरणच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. दिवसभरात तासंतास वीज पूरवठा खंडित राहत असून त्याला महावितरणचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करुन काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरणच्या कर्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वारंवार तक्रारी करुनही वीज वितरण कंपनीच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने कार्यकर्त्यांनी अधिकार्यांना बेशरमचे झाड भेट देवून निषेध नोंदविला.
धामणगाव रेल्वे शहर तसेच तालुक्याच्या वीजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. गावठाणच्या डीपी उघड्यावर आहेत. फेज तार उपलब्ध नाही. शहरातसुद्धा महावितरणच्या दिरंगाईचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. असे काँग्रेसचे म्हणणे आहे. स्थानिक आमदारांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महावितरणच्या या अनागोंदीविरोधात शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने नारगावंडी येथे महावितरणच्या कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले.
ठिय्या देवून कारभारात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच बेशरमचे झाड देवून वीज कंपनीच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविण्यात आला. आठ दिवसाच्या आत कारभार पूर्ववत सुरळित करण्यात येईल, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता उंबरे यांनी दिले. त्यानंतर काँग्रेसने आपले आंदोलन मागे घेतले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस परीक्षित जगताप, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप मुंदडा, कार्याध्यक्ष चंदू डहाणे, श्रीकांत गावंडे, पंकज वानखडे, नितीन कनोजिया, सुनील भोंगे, नंदकिशोर राठी, अशीष जयस्वाल, राजेश पुरोहित, गणेश धवणे, आशिष काळपांडे, अविनाश मांडवणे, मंगेश बोबडे, आशिष भोंगे, जावेद खान, अजय तुपसुंदरे, मुकुंद माहोरे, आशिष मुंदडा, ओमप्रकाश बुधलानी, संजय शेंडे, नंदकुमार मानकर, प्रशांत भेंडे, प्रशांत हुडे, कविष गावंडे, दिनेश वैरागडे, मगन नगराची, माणिक मडावी, संदीप जाधव, प्रशांत वाघमारे, रवींद्र कडू, रमेश शर्मा, नितीन शेळके, अशोक गोफणे, निलेश वानखडे, स्वप्निल मालखेडे, हरीश सावरकर, गोपाल लोंदे, विजय पिल्लारे, अनिस खा पठाण, रवींद्र डबले, शुभम तरोणे, चंद्रकांत तुपट, जयंत भालेकर, आशिष डुंमरे आदी उपस्थित होते.