उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी केली विविध परिसराची पाहणी

नाले सफाई 100 टक्के पूर्ण करण्याच्या सूचना

अमरावती /4 जून: उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी बुधवारी नाले सफाईच्या कामाची पाहणी केली. प्रशांत नगर, जमील कॉलनी, मुस्लिम बहुल एरिया, महेंद्र कॉलनी येथील नाले सफाईचा आढावा घेतला. नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको. सगळे नाले 90 टक्के नव्हे तर 100 टक्के साफ झाले पाहिजेत, हेच डोक्यात ठेवून काम करावे, अशा स्पष्ट सूचना महापालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभागांना दिल्या.
सदर मार्गालगत असलेल्या नाल्यातून गाळ उपसण्याचे काम पोलकेन मशीनच्या मदतीने सुरू आहे. सदर परिसरातील नाल्यात मशीन जाणे शक्य नाही. तेथे मनुष्यबळाचा वापर करून गाळ साफ केला जाईल, याची दक्षता घ्यावी. कल्व्हर्ट खालील गाळ काढला नाही, तर त्याच्या अलिकडच्या भागातील नाले सफाईची उपयुक्तता शून्य राहील, असेही उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी नमूद केले. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा असून त्यांची सफाई हे मोठे आव्हान आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले साफ होतील, तसेच वेळोवेळी त्यांची सफाई केली जाईल. तसेच, अतिवृष्टीच्या काळात अधिक लक्ष ठेवले जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश उपायुक्तांनी दिले. या पाहणी दरम्यान नाल्यातील झुडपे हटविण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्या. या झुडपांमध्ये कचरा अडकून तो नाल्याचा प्रवाह बाधित करतो. त्यामुळे जसा नाल्यातील गाळ काढला जातो आहे, तसेच ही झुडपे आणि इतर अडथळे दूर करण्यास उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी सांगितले. तसेच, रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ उचलला जाईल याची खबरदारी घेण्याची सूचना दिली. या पाहणी सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button