महाविद्यालयीन युवकाला चाकूच्या धाकावर लुटले

दुचाकीवर लिफ्ट देवून जबरी चोरी

अमरावती / 16 मे: राजापेठ बसस्थानकावरुन लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महाविद्यालयीन युवकाला दुचाकीवर बसविल्यानंतर भामट्याने त्यालाच चाकूच्या धाकावर लुटल्याच घटना शहरातील राम नगर भागात घडली. पिडित युवकाच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
यासंदर्भात नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी असलेल्या वृषभ विष्णू मडावी या 24 वर्षीय युवकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वृषभ हा अमरावती येथे तक्षशिला महाविद्यालयात एमएससीचे शिक्षण घेत आहे. तो राम नगर भागात भाड्याने राहतो. बुधवारी, दुपारी अडिच वाजताच्या सुमारास वृषभ नांदगाव खंडेश्वर येथून एसटी बसने राजापेठ बसस्थानकावर पोहोचला. त्याला रामनगर येथे जायचे होते. दरम्यान एक स्कुटीचालक त्याच्याजवळ आला आणि कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली. आपल्या फ्रेजरपूरा येथे जायचे असल्याचे वृषभने सांगितले तेव्हा आपणही तिकडेच जात असल्याचे सांगून त्या 24-25 वर्षे वयाच्या युवकाने वृषभला सोडून देतो म्हणत आपल्या दुचाकीवर बसविले.
कल्याण नगर मार्गे दोघे प्रशांत नगर परिसरातील रामनगर येथे पोहोचल्यानंतर त्या युवकाने दुचाकी थांबविली आणि वृषभला चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. घाबरलेल्या वृृषभने त्याला जवळचे हजार रुपये काढून दिले. तेव्हा त्या युवकाने आणखी पैशांची मागणी करुन चाकूने वार करण्याची धमकी दिली. तेव्हा वृषभने क्युआर कोड घेउन 5 हजार रुपये त्याच्या अकाउंटवर टाकले. त्यानंतर तो युवक तेथून निघून गेला. या घटनेनंतर वृषभने राजापेठ पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. ज्या खात्यावर वृषभने 5 हजार रुपये पाठविले त्याची तपासणी केली असता ते खाते शंतनु गजानन पटोळे याचे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button