अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार

सुरक्षा रक्षकांना पाच महिन्यांपासून पगार नाही, रुग्णांचे हाल, प्रशासन गप्प

अचलपूर /29 मे: अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सध्या संपूर्णपणे ढासळलेला असून, रुग्णालयात कार्यरत सुरक्षा रक्षक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपली ड्युटी करत आहेत. मागील पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था भयंकर झाली आहे. शिक्षण, अन्नधान्य, वैद्यकीय गरजा आणि दैनंदिन गरजा पूर्ण करणं अशक्य झालं आहे.
या सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, त्यांना मुलांच्या शाळेतील अ‍ॅडमिशनसाठी पैसे देता आलेले नाहीत, घरात किराणासाठा संपलेला आहे, तर काही दिवसांपासून उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. किराणा दुकानदार आणि भाजीवाले आता उधारीवर सामान देण्यास नकार देत आहेत. काही रक्षक तर रोजचा प्रवासही खिशातून करत असून, त्यांच्याकडे दैनंदिन खर्चासाठीही पैसे नाहीत.
या गंभीर समस्येकडे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. त्यांनी आजवर यावर कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. याशिवाय, रुग्णालयातील लाईन देखील सकाळपासून बंद आहे, त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना तपासणीसाठी ताटकळत बसावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद असल्याने अनेकांनी पाण्यासाठी इतरत्र धावपळ केली. एखाद्या सरकारी आरोग्य संस्थेची अशी अवस्था ही अत्यंत दुर्दैवी आहे.
सुरक्षा रक्षकांनी यावेळी मीडिया समोर आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, आम्ही रुग्णालयात रात्रंदिवस सेवा देतो, तिथे सुरक्षेची जबाबदारी पेलतो, पण आमच्यासाठी कोण आहे? पाच महिने पगार नाही, तरीही आम्ही कर्तव्य सोडलेलं नाही, पण आता जगणंच कठीण झालंय.
सध्या तरी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुग्णांचे हाल, कर्मचारी वर्गाचे दुर्लक्षित जीवन, आणि व्यवस्थापकांचे दुर्लक्ष – हे सर्व एकत्र आल्यामुळे रुग्णालयाचा कारभार कोलमडलेला आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये शासन आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, सुरक्षारक्षकांचा थकीत पगार त्वरित द्यावा आणि रुग्णालयाच्या मूलभूत सुविधा सुरळीत कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
शेवटी प्रश्न हाच – सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे रक्षण करणारे हे रक्षक, स्वतःसाठी न्याय आणि पगार कधी मिळवणार?

संबंधित बातम्या

Back to top button