अज्ञात वाहनाची धडक, ऑटोचालकाचा मृत्यु

वलगाव मार्गावरील घटना

अमरावती / 20 मे: अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ऑटोचालकाचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा नवसारी-वलगाव मार्गावर आप्पा हॉटेलसमोर घडली. शेख शहबाज शेख हारुण (30, रा. यास्मिन नगर) असे मृतकाचे नाव आहे.
शेख शहबाज हा मालवाहू ऑटोचा चालक होता. तो आपल्या एमएच 27 / बीडब्ल्यू 4371 क्रमांकाच्या ऑटोने टाईल्स पोहोचविण्याचे काम करायचा. सोमवारी रात्री उशिरा शेख शहबाज हा वलगाव मार्गावर नवसारी परिसरात असलेल्या आप्पा हॉटलसमोर आपला ऑटो उभा करुन रस्त्यावर फेरफटका मारत होता. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. शेख शहबाज हा रस्त्यावर कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीचालक पसार झाला.
आजूबाजूला हजर असलेल्या लोकांनी अपघात झाल्याचे लक्षात येताच शेख शहबाजला तात्काळ जमील कॉलनी स्थित बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. पण तेथे त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अज्ञात आरोपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button