पेट्रोलपंप चालकाला हल्ला करुन लुटण्याचा प्रयत्न

डोक्याला गंभीर दुखापत

-चार अज्ञात युवकांचे कृत्य
-रुख्मिणी नगर परिसरातील घटना
अमरावती / 18 मे: पेट्रोल पंप चालकावर चार अज्ञात युवकांनी दगडफेक व हल्ला करुन त्यांना लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. रुख्मिणी नगर परिसरात जोगळेकर प्लॉट येथे पटवारी भवनसमोर ही घटना घडली. या घटनेत पेट्रोल पंप चालक सौरभ संजय जगताप (39, गांधी नगर, अमरावती) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जगताप यांच्या डोळ्यात आरोपींनी मिरची पुडही टाकली होती. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.
सौरभ जगताप हे शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास आपल्या रुख्मिणी नगर येथील पेट्रोल पंपावरुन एमएच 27 / बीएच 5235 क्रमांकाच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. जोगळेकर प्लॉट परिसरातील पटवारी भवनसमोर ते पोहोचले तेव्हा रस्त्याच्या उजव्या बाजूला दोन आणि डाव्या बाजूला दोन असे वीस ते पंचविस वर्ष वय असलेले चार युवक उभे होते. जगताप यांना बघून या युवकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि अंगावर धावून आले. एका युवकाने त्यांच्या डोळ्यात मिरची पूडही फेकली. यावेळी आरोपींनी जगताप यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकण्याचा प्रयत्न केला. एका युवकाने त्यांच्या डोक्यात दगड मारल्याने गंभीर दुखापत झाली. यावेळी जगताप यांनी या युवकांचा जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेले. जखमी अवस्थेतच जगताप यांनी काही अंतरापर्यंत एका युवकाचा पाठलाग केला, मात्र डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने ते माघारी परतले व आपल्या घरी पोहोचले.
त्यानंतर सौरभ जगताप स्वत:च कुटुंबियांसह रिम्स हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत जगताप यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button