शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा द्या म्हणत आशा वर्कर्सची निदर्शने

जिल्हा कचेरीवर धडक

अमरावती /21 मे: आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा आणि तो मिळेपर्यंत आरोग्य विभागात समायोजन या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील आशा व गट प्रवर्तकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रेखा मोहोड आणि सचिव प्रफुल्ल देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यामार्फत शासनाकडे निवेदनही पाठवण्यात आले. शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा या प्रमुख मागणीशिवाय केंद्र सरकारने जानेवारी 2025 पासून आशा आणि गटप्रवर्तकांचा मोबदला दिला नाही, तो तातडीने द्यावा, आशांना किमान वेतन 24 हजार रुपये तर गट प्रवर्तकांना 34 हजार रुपये किमान वेतन देऊन वेगळा प्रवास भत्ता द्यावा, आजारात मृत्यू झाल्यास कार्यरत आशा व गट प्रवर्तकांना 10 लाख रुपयांपर्यंतची मदत द्यावी, आशा व गट प्रवर्तकांना राज्यभर एकच गणवेश असावा, तो गणवेश कोणत्या रंगाचा असावा याबाबत आशा व गटप्रवर्तकांचे मत जाणून घ्यावे, सर्व कर्मचार्‍यांशी बोलणीनंतरच रंग निश्चित करावा ऑनलाइन कामाची सक्ती बंद करावी, आशा वर्कर्स यांना अनेक अधिकारी, कर्मचारी अपमानास्पद वागणूक देतात, तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, याकडेही आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्यात आशा तक्रार निवारण समिती स्थापन करून दरमहा बैठक घेतली जावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात सत्वशीला तायडे, सुजाता तेटू, ललिता ठाकरे, आशा ठाकरे, सुषमा रहांगडाले, निर्मला सोनवणे, ममता सुखदेवे, रत्नकला खडसे, सुजाता गजभिये, सुनीता भेंडारकर, सीमा घोडेस्वार, वर्षा जयस्वाल, अलका वानखेडे, मनीषा कापडे, श्रुतिका मेश्राम, माधुरी आवनकर, लला दंदे, सुनीता यादव आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

संबंधित बातम्या

Back to top button