पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असावे
आ. सुलभा खोडके यांचे निर्देश

-हानी टाळण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना
-महापालिकेत नियोजन व उपाययोजनांबाबत बैठक
अमरावती / 22 मे: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी. आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश आमदार सुलभा संजय खोडके यांनी आज दिले.
मान्सून पूर्व तयारी 2025 आढावा बैठक महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज गुरुवारी पार पडली. यावेळी आमदार संजय खोडके, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिंदे, मजीप्राचे अधिक्षक अभियंता साळुंखे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गिरी, यश खोडके, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार सुलभा खोडके म्हणाल्या, हवामान विभागाने वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावे. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील, याची दक्षता घ्यावी. वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी. बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
गाळ, मनपा क्षेत्र, अतिधोकादायक कारखाने, बोट, शोध व बचाव साहित्य, फायर सूट, पोर्टेबल इन्फ्लॅटेबल एलईडी लाईट सिस्टीम, रोप आणि रेस्क्यू किट, जेसीबींची संख्या, होर्डिंग्ज याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागात नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. जिथे तांत्रिक यंत्रणा पोहचू शकत नाही तिथे मनुष्यबळाद्वारे नाले साफसफाई करावी. नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. भुयारी गटार संदर्भात मजीप्रा आणि महानगरपालिका यांची समन्वय समिती निर्माण करण्याचे निर्देश आमदारांनी दिले.
बांधकाम विभागाने धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. शहरातील विविध भागात मान्सून कालावधीपर्यंत जेसीबी, पोकलेन, डंपरची व्यवस्था कायमस्वरुपी करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यात साथीचे रोगांचा प्रसार होवू नये म्हणून उपाययोजना करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी महानगरपालिकेने केलेल्या मान्सून पूर्व तयारी व आपत्ती निवारण याबाबतची माहिती दिली.
-आरोग्य यंत्रणांनी तत्पर राहावे
मान्सूनमधील संभाव्य साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी, असे सांगत सुलभा खोडके म्हणाल्या की, पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणार्या भागात तत्परतेने मदत पोहोचण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे, आपत्ती कालावधीत सतर्कतेबाबत माहिती पोहचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.