पावती 70 कट्ट्यांची ट्रकमध्ये आढळले 86 कट्टे
तुर आणि हरभरा चोरीचा भांडाफोड

-कृउबा समितीत खळबळ
अमरावती / 16 मे: आज सकाळी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत मिनी ट्रकमधून सोयाबीनच्या नावावर तुर आणि हरभर्याच्या कट्ट्यांच्या कथित चोरी प्रकरणाचा भांडाफोड झाल्याने खळबळ उडाली होती. सोबतच पावतीत 70 कट्ट्यांची नोंद असताना ट्रकमध्ये 86 कट्टे आढळून आले. हे प्रकरण गाडगेनगर पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. सदर ट्रकचा चालक सतिश गुप्ता याची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान ट्रक चालकाने याप्रकरणात लव्हाळे आणि काळे या व्यक्तींची नावे घेतली. घटना उघडकीस आली तेव्हा हे दोघेही बाजार समितीच्या जावक द्वारातून पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा मोठा आणि गंभीर प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयशर ट्रक क्रमांक एमएच 21 / एक्स 4898 मध्ये शेतमालाचे कट्टे ठेवण्यात आले होते. यावेळी बाजार समितीचे निरिक्षक इंगोले यांनी या ट्रकची तपासणी केली. पावतीवर 70 कट्ट्यांची नोंद होती. गेट पास क्रमांक 26053 अविनाश ट्रेडरच्या नावाने होता. तपासणीत निरिक्षक इंगोले यांना ट्रकमध्ये तुरीचे 37, हरभर्याचे 14 आणि सोयाबीनचे 35 कट्टे आढळून आले. याची नोंद इंगोले यांनी पंचनाम्यात केली. यावेळी अविनाश लव्हाळे तपासणी सुरु असताना संशयास्पदरीत्या तेथून निघून गेल्याचे आणि अतिरिक्त माल हा मातेरा असावा, असेही पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
या ट्रकमधील 86 कट्टे जप्त करुन बाजार समितीच्या सभागृहात वेगळे गंजी लावून ठेवण्यात आल्याचे इंगोले यांनी पंचनाम्यात म्हटले आहे. पंचांसमोर ही कार्यवाही करण्यात आली. बाजार समितीने वजन पावतीसोबतच गेटपासही जप्त केली. ट्रकचालक सतिश गुप्ताचे बयाण नोंदविण्यात आले आहे. गुप्ता याने सांगितले की, त्याचे ट्रान्सपोर्टचे काम आहे. फोनवरुन सूचना देण्यात आली त्यानुसार आपण माल ट्रकमध्ये लादला आणि तो आपण बाजारातून घेउन जात होतो.