आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांना राज्यस्तरीय संस्कार महर्षी पुरस्कार प्रदान

दासटेकडी गुरुकुंज येथे समारंभ संपन्न

गुरुकुंज-मोझरी/26 मे– देशाची भावी पिढी सुसंस्कारित, व्यसनमुक्त व सद्विचारी व्हावी, यासाठी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांसह मध्यप्रदेश, तेलंगणा व आंध्र-प्रदेशातही सर्वांगीण सुसंस्कार शिबिरे आयोजित करून देश-धर्म-संस्कृतिस पोषक आदर्श नागरिक तयार व्हावा, म्हणून सुसंस्कारित पिढी निर्मिण्याचे सत्कार्य करणारे अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन-प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांना पद्मश्री फाउंडेशन, नागपूर व साक्षी कथ्थक नृत्य अकादमी चॅरिटेबल फाउंडेशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच राज्यस्तरीय संस्कार महर्षी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
गुरुकुंज-मोझरी नजिकच्या राष्ट्रसंत अध्यात्म केंद्रात संपन्न झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय आदमने तर प्रमुख मान्यवर म्हणून साक्षी कथ्थक नृत्य अकादमी चॅरिटेबल फाउंडेशन, वर्धाच्या अध्यक्षा डॉ. किरणताई खडसे, अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार संस्था, दासटेकडी येथील अध्यक्ष माधव सूर्यवंशी, विश्वस्त रामदास चोरोडे गुरुजी, ज्येष्ठ प्रचारक प्रल्हाद पारिसे, अरुण सालोडकर गुरुजी, सचिव प्रमोद पोकळे, बाळकृष्ण हांडे, शंकर मोहोड, प्रमोद भोंगे, मनोहर रेचे, नामदेव गव्हाळे, सुरेश घाटोळ, रामदास सनके व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास व मार्गदर्शन लाभलेल्या आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांची 1968 मध्ये वर्धा जिल्हा प्रचारक म्हणून राष्ट्रसंतांनी नियुक्ती केली होती. त्यानंतर सत्संग साप्ताहिक, अष्टश्लोकी भागवत अशा अनेक ग्रंथांचे संपादन करून गेल्या 44 वर्षांपासून आजतागायत श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख बाल-तरुणांना सुसंस्कारांचे धडे देऊन राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले. या अमोलिक सेवाकार्याबद्दल राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या 116 व्या ग्रामजयंती निमित्त आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांना सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र वानखडे, डॉ. नरेंद्र तराळे, दिनकर चोरे, डॉ. संतोष सनके, सुश्री कविताताई येनूरकर यांचेसह अनेक नागरिक आवर्जून उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button