शहरात बगर नंबर प्लेटच्या गाड्या चालविणार्यांचा मोठा सुळसुळाट
वाहतूक करणार्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई

मोर्शी /9 जून: मोर्शी शहरात सध्या बगर नंबर प्लेटच्या गाड्या चालविणार्यांचा सुळसुळाट झाला असल्याचे पाहून मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या मेन चौकात नाकाबंदी करून अशा प्रकारच्या वाहतूक करणार्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्यामुळे बगर नंबर प्लेटची गाडी चालवणार्यांचे धाबे दणाणले आहे. मोर्शी शहरासह तालुक्यात कित्येक टू व्हीलर वाहनधारक बगर पासिंग व नंबर प्लेटच्या गाड्यांची वाहतूक करीत असून या गाड्यांनी अपघात घडल्यास त्या वाहनधारकाचा पत्ता सुद्धा लागणार नाही. नुकतेच सिंभोरा रोडवर एका टू व्हीलर वाहनधारकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत झटका देऊन लंपास केल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने ठाणेदार नितीन देशमुख यांनी कडक पाऊल उचलून बगर नंबर प्लेटच्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.यासाठी शहरातील सिंभोरा चौक जयस्तंभ चौक व इतरही ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस चमू तैनात करण्यात येऊन बॅरिगेट लावून नाकाबंदी करण्यात आली आहे.तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांनी दंडात्मक कार्यवाही टाळण्यासाठी वाहन धारकांनी आपल्या गाडयांना नंबर प्लेट लावण्याबाबत तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.