बडनेरा आगारात भावनात्मक वातावरणात 77 वा वर्धापन दिन साजरा
लालपरीच्या सेवेला सलाम

-व्यवस्थापक वैशाली भाकरे यांच्याकडून शुभेच्छा
अमरावती /2 जून: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ओळख असलेली लालपरी यंदा तिच्या 77 व्या वर्धापन दिनात दाखल झाली. बडनेरा आगारात हा दिवस अत्यंत भावनात्मक वातावरणात, उत्साह आणि सन्मानाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बडनेरा आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांनी आगारातील अधिकारी, चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी व इतर सर्व कर्मचार्यांना तसेच सर्व प्रवासी बांधवांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. लालपरी ही केवळ बस नव्हे, ती सेवा, समर्पण आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे. 77 वर्षांची अखंड सेवा ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. लालपरीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
विशेष सजवलेली एसटी बस प्रस्थान करण्यात आली. कार्यक्रमात लालपरीच्या प्रवासाची आठवण, तिचे ग्रामीण व शहरी जीवनाशी असलेले नाते, तसेच तिचा सामाजिक आणि आर्थिक योगदान यावरही चर्चा झाली. कार्यक्रमात सहभागी कर्मचार्यांनीही लालपरीबाबत आपले अनुभव व्यक्त करताना भावनांनी ओथंबून गेले. वैशाली भाकरे म्हणाल्या: राज्यातील प्रत्येक कोपर्यात पोहोचणारी लालपरी ही आमची शान आहे. तिच्या सेवेत असलेला प्रत्येक कर्मचारी हे अभिमानाने म्हणू शकतो की – मी लालपरीचा एक भाग आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी विशेष सजवलेल्या लालपरीला पुष्पहार अर्पण करून आगारातून एक सांघिक शोभायात्रा काढण्यात आली. उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि सेवेची ही परंपरा पुढे नेत राहण्याचा संकल्प केला. 77 वर्षांची ही अखंड सेवा आणि निष्ठा यामुळे लालपरी आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात घर करून आहे. बडनेरा आगारात साजर्या झालेल्या या वर्धापन दिनाने सेवा, समर्पण आणि सार्वजनिक विश्वसनीयतेचा एक नवा अध्याय लिहिला.