चाकूच्या बळावर लुटली बँकेची 13.8 लाखांची रोकड
मोर्शीतील खळबळजनक घटना

-कर्मचार्यांना धमकावून रक्कम हिसकली
-दुचाकीवरुन आलेल्या आरोपीचे कृत्य
मोर्शी / 25 जून: बँकेत जमा करण्यासाठी नेली जात असलेली एका फायनान्स कंपनीची 13 लाख 8 हजार 720 रुपयांची रोकड बँकेच्या दोन कर्मचार्यांना चाकूचा धाक दाखवून लुटून नेल्याची घटना मोर्शी शहरात आज बुधवार, 25 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मोर्शी शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पल्सर मोटरसायकलवरुन आलेल्या एका आरोपीने हे कृत्य केले.
प्राप्त माहितीनुसार शहरातील कॉलनी परिसरात क्रेडिट ऍसेस मायक्रो ग्रामीण प्रायव्हेट लि. ही कंपनी आहे. येथे ग्रामीण भागातील गटाचे पैसे वसूल करतात व जमा झालेली रक्कम मोर्शीच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत जमा केली जाते. नेहमीप्रमाणे बँकेतील कर्मचारी शुभम गुणवंत म्हस्के (25) व सुंदर शालीकराम धिकार (28) हे दोघेजण एमएच 27 / डीडी 5041 या दुचाकीने दुपारी 3 वाजताच्या सुमारास क्रेडिट एसेस मायक्रो ग्रामीण प्रायव्हेट लिमिटेड येथील 13 लाख 8 हजार 720 रुपये मोर्शीच्या भारतीय स्टेट बँकमध्ये जमा करण्यासाठी नेत होते. दरम्यान मुख्य रस्त्यावर असलेल्या सेन्ट्रल बँकेसमोर मागून आलेल्या पल्सर गाडीवरील एकाने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे दोन्ही कर्मचारी खाली पडले. त्यानंतर आरोपीने त्यांना चाकू दाखवून त्यांच्या गाडीची चाबी व पैशाची बॅग हिवकावून घेतली आणि क्षणार्धात पलायन केले.
लुटण्यात आलेली रक्कम 24 व 25 जून या दोन दिवसांत जमा केलेली होती, असे समजते. या घटनेमुळे मोर्शी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. बँक कर्मचार्यांच्या तक्रारीवरुन मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. याआधी शहरात 18 जून रोजी क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून दोन अज्ञात चोरट्यांनी श्यामसुंदर राधाकिसन बंग यांची सोन्याची अंगठी व गोफ असा दोन लाखाचा ऐवज हात सफाईने लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




