11 वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया आता 26 मेपासून
पहिल्या फेरीची नोंदणी सुरू होणार

-विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार
-बुधवारी पहिल्याच दिवशी गोंधळ
अमरावती / 22 मे: दहावीची परीक्षा यशस्वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेच्या ’परीक्षेतून’ जावं लागतं आहे. बुधवारी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करताना अडचणींचा सामना करावा लागला. बेवसाईट ठप्प झाल्याने पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी करण्यात आलेली व्यवस्था कोलमडून पडली होती. त्यानंतर आता अकरावी प्रवेशासाठी 26 मेपासून पहिल्या फेरीची नोंदणी सुरू होणार आहे. त्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम आदी सर्व भरता येणार आहेत, असे शिक्षण संचालनालय कार्यालयानं म्हटलं आहे.
पालकांसह विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेल्या शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली. अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अल्पावधीच वेबसाईट क्रॅश झाल्यानं ’बॅड गेटवे’ या मेसेजच्या पुढे वेबसाईटवरील प्रक्रिया सुरू नव्हती. त्यानंतर शिक्षण संचालनालयाच्या हेल्पलाइनवरून ठोस माहिती मिळाली नाही तसेच प्रतिसादही न मिळाल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून आज अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
राज्यभरातून यंदा दहावीच्या परीक्षेत 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये तब्बल 20 लाख 91 हजार 390 जागा आहेत. या जागांसाठी 21 मे रोजीपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान शिक्षण संचालनालयाचा प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी गोंधळ उडत असतो. त्यामुळे राज्यभरातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्याबाबत शिक्षणतज्ञांकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. ही शिक्षणतज्ञांची शंका शिक्षण विभागाकडून पहिल्याच दिवशी खरी ठरली. पहिल्या दिवशी प्रवेश नोंदणीचा गोंधळ झाल्यानं अकरावी प्रवेशाच्या वेबपोर्टलमध्ये बदल करण्यात आले आहेत. ही वेबसाईट मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे, यासाठी पोर्टलची सुविधा बुधवारी दुपारपासून बंद ठेवण्यात आली होती, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.
-येथून विद्यार्थ्यांना घेता येणार माहिती
अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 26 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी माहिती त्वरित आणि सुलभ मिळण्याकरिता शिक्षण संचालनालया तर्फे https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DB-1etTOdyi10C अधिकृत व्हॉट्सअप चॅनेल सुरू करण्यात आलेलं आहे. यावर सर्व विद्यार्थ्यांना सर्व अपडेट दिले जाणार आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर सर्व माहिती पाहावी अशा सूचना शिक्षण संचालनालयानं दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियांदरम्यान काही अडचण आल्यास 85 30955564 हा हेल्पलाईन नंबर तसेच supportmahafyjcadmissions.in हा सपोर्ट ईमेल आयडी देण्यात आला आहे.