कर्जमाफी व हमीभावासाठी शेतकर्‍यांची तहसिलवर धडक

चांदूर बाजारात आक्रोश मोर्चा

-शेकडो शेतकर्‍यांचा सहभाग
-सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
चांदूर बाजार/ 16 मे : राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आणि त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज चांदूर बाजार येथे शेकडो शेतकर्‍यांनी आक्रोश मोर्चा काढून तहसिल कार्यालयावर धडक दिली. लोकविकास संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. सत्तेत आल्यानंतर सरकारने आपला शब्द फिरवून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणे पूसण्याचे धोरण अवलंबिले आहे. ही शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप करुन संतप्त शेतकर्‍यांनी हा मोर्चा काढला होता. शेतकरी आर्थिक संकटात असून कर्जमाफीसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलने केली जात असली तरी महायुती सरकार त्यासंदर्भाने अजिबात गंभीर नाही, याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. बड्या उद्योजकांचे कर्ज एका झटक्यात माफ करणारे सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याना मात्र आर्थिक बाबी समोर करुन आपल्याच शब्दापासून घुमजाव करते, हा शेतकर्‍यांवर अन्याय असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आज सकाळी दहा वाजता चांदूरबाजार येथे खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात शेकडो शेतकर्‍यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारअर्पण केले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांनी हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चात लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्यासह विजय राऊत, रमण लंगोटे, श्रेयस बर्वे, प्रवीण जामोदकर, रवी काशीकर, कदीर पठाण, नितीन रेखे, गौरव वैद्य, उमेश तायडे, आकाश खेलदार, इमरान सौदागर, निळकंठ चव्हाण, ऋषिकेश रडके, अथर्व विचे, राम हूशंगाबादे, संतोष नागपुरे आणि असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button