वरुडात नगरपरिषद निवडणुकीत 64.07 टक्के मतदान

9 नगराध्यक्ष तर 115 नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे भाग्य सिलबंद

वरुड । 2 डिसेंबर – तब्बल 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज दि.2 ला स्थानिक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या 25 जागांकरीता मतदान पार पाडले. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या नगराध्यक्ष पदाकरीता 9 आणि नगरसेवक पदाकरीता 115 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले. आज झालेल्या मतदानामध्ये 64.07 टक्के मतदान झाले. यामध्ये 40 हजार 890 मतदारांपैकी एकूण 26 हजार 200 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले.
वरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी ही निवडणुक पार पडली यात नगराध्यक्षाकरीता जनतेतून आणि नगरसेवकाकरीता प्रभागनिहाय मतदान घेण्यात आले. मतदान केंद्र दूर असल्यामुळे आज दिवसभर मतदारांना वाहून नेण्याकरीता सर्व उमेदवारांकडून विविध वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अंध, अपंग आणि गरोधर माता सुध्दा मतदानाचा हक्क बजावतांना दिसुन आल्या. शहरातील 7 अतिसंवेदनशिल केंद्रांवर सुध्दा शांततेत मतदान पार पडल्याचे दिसुन आले. आज मतदान पार पडल्यानंतर सर्व उमेदवार व मतदारांचे निकालाकडे लक्ष लागुन आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस श.प., भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अ.प., राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा, शिवसेना, प्रहार तसेच अपक्षांचे सर्वस्व पणाला लागले असले तरी मात्र काही प्रभागामध्ये रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांमुळे अनेकांची समिकरणे बिघडण्याची चिन्हे दिसून आली. आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाचे आ.चंदु उर्फ उमेश यावलकर, राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.चे माजी आ.देवेंद्र भुयार, माजी आ.हर्षवर्धन देशमुख, गिरीष कराळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी या सर्व उमेदवारांच्या निकालाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अ.प., आणि भाजपामध्ये दुहेरी लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केल्या जात आहे. वरुड शहरामध्ये 13 प्रभागांमध्ये एकूण 40 हजार 890 मतदार आहेत. यापैकी 26 हजार 200 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील 45 मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले असुन मतमोजणीच्या दिवशी 14 टेबलवर ही मतमोजणी करण्यात येणार आहे. एका टेबलवर पोस्टल मतमोजणी 45 कर्मचारी नियुक्त केले असून सांस्कृतीक भवन येथे स्ट्राँग रुम तयार करण्यात आली आहे. या स्ट्राँग रुम असलेल्या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी 9 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असुन या स्ट्राँग रुमवर वेळोवेळी निवडणुक निर्णय अधिकार्‍यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी भेटी देत राहणार असल्याची माहिती यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button