नगराध्यक्षपदासाठी भाजपला युवा स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा

सदस्यपदांवर मैत्रीपूर्ण लढत

* जिल्ह्यातील निवडणुकीची रंगत वाढली

अमरावती /26 नोव्हेंबर – जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि बारा स्वायत्त संस्थांमध्ये 2 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुकांना वेग येत असतानाच युवा स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासाठी भाजपला खुला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र सदस्यपदांसाठी अनेक उमेदवार उभे केल्याने भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दिसून येणार आहे.
या संदर्भातील निवेदन युवा स्वाभिमान पक्षाच्या निवडणूक कोअर समितीने जारी केले असून जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला नवी दिशा मिळाली आहे. निवेदनानुसार, नगराध्यक्षपदासाठी भाजपचे सर्व 12 उमेदवारांना समर्थन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नगरपालिका क्षेत्रात युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार आहेत. भाजपने जाहीर केलेल्या नगराध्यक्ष उमेदवारांमध्ये चिखलदरा येथून राजेंद्र सिंह सोमवंशी, अंजनगाव सुर्जी येथून अविनाश गायगोले, अचलपूर येथून रूपाली माथणे, दर्यापूर येथून नलिनी भारसाकळे, चांदूर रेल्वे येथून स्वाती मेटे, मोर्शी येथून रश्मी उमाळे, चांदूर बाजार येथून कांता अहिर, शेंदूरजनाघाट येथून सुवर्णा वरखेडे, वरूड येथून ईश्वर सलामे, धामणगाव रेल्वे येथून अर्चना अडसाद-रोथे, नांदगाव खंडेश्वर येथून स्वाती पाठक आणि धारणी येथून सुनील चौथमल यांचा समावेश आहे. युवा स्वाभिमान पक्षाने या सर्व उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपला पाठिंबा दिल्यानंतरही सदस्यपदांसाठी युवा स्वाभिमान पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. अचलपूर नगर परिषदेत नितीन यादव, शुभम पुरोहित, वंदना चावरे, शारदा गावंडे, माया धवन, बबलू वानखडे, राजवंती वाकपंजर, तमिळ शहा रमण शहा, रवी वानखडे आणि रक्षा वानखडे या दहा उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. चांदूर बाजार येथील वॉर्ड क्रमांक 1 मधून कुलदीप शर्मा, दर्यापूर येथील वॉर्ड क्रमांक 4 मधून शोभा ठाकरे व किरण श्रीराव, अंजनगाव सुर्जी येथील विविध वॉर्डांत रजनी पाटील, कोमल इंगळे, अमोल कावरे, सीमा तायडे, सुषमा व्यवहारे व संजय नाथे तर धारणी नगरपंचायत क्षेत्रात राय, गौरव ठाकूर, विकास धुर्वे आणि दीक्षा प्रजापती या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी सदस्यपदांसाठी युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पातळीवरील उपस्थितीमुळे निवडणुकीला चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध पत्रकावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीळकंठ कात्रे, मार्गदर्शक सुनील राणा, राष्ट्रीय सचिव जयंत वानखडे, सरचिटणीस प्रा. अजय गाडे, कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे आणि इतर वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. अधिकार्‍यांच्या या सामूहिक भूमिकेमुळे पक्षाचा निर्णय अधिकृत स्वरूपात लागू झाला आहे. नगराध्यक्षपदावर भाजपला उघड पाठिंबा आणि सदस्यपदांसाठी मैत्रीपूर्ण स्पर्धा या धोरणामुळे जिल्ह्यातील निवडणूक अधिक चुरशीची झाली असून मतदारही या नव्या समीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button