आयपीएलवर लाखोंचा सट्टा, 6 बुकी जेरबंद
अंतिम सामन्यादरम्यान कारवाई

-वेगवेगळ्या ठिकाणी छापे
-3.89 लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती / 4 जून: मंगळवारी आयपीएलच्या आरसीबी बंगलोर आणि किग्स इलेव्हन पंजाब या संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यादरम्यान अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला गेल्याचे उघडकिस आले आहे. अमरावती पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन सहा बुकिंना जेरबंद केले. त्यांच्याकडून 22 मोबाईल सह लॅपटॉप असा एकुण 3 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडगेनगर आणि राजापेठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये योगेश प्रमोद साबू (36, रा. छांगाणी नगर), हर्षल हनुमानदास राठी (36, रा. कोल्हटकर कॉलनी), दीपक शंकर गोस्वामी (37, रा. लकडगंज, नागपूर), आकाश किसनराव इंगोले (32, रा. अंजनगाव बारी), अखिल हरिश त्रिकोटी (33, रा. सिंधी चौक, रामपुरी कॅम्प) व अन्य एकाचा समावेश असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. राजापेठ आणि गाडगेनगर तसेव वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्द्ीत मंगळवारी रात्री आयपीएलच्या अंतिम सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळाली. त्यानंतर या गैरप्रकाराचा छडा लावण्यासाठी पोलिस प्रशासन तात्काळ सक्रिय झाले. गुन्हे शाखा युनिट – 1 ची दोन पथके तयार करण्यात आली. त्यांनी दोन ठिकाणांवर छापे मारुन सहा आरोपींना अटक केली व मुद्देमाल जप्त केल्याची माहिती चावरिया यांनी दिली.
आरोपींवर गाडगेनगर आणि राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 22 मोबाईल हॅन्डसेट, तीन लॅपटॉप, व्हाईस रेकॉर्डर, एलईडी टीव्ही तसेच 48 हजार 200 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर आणि सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण पाटील, जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक मनीष वाकोडे आणि योगेश इंगळे, उपनिरिक्षक प्रकाश झोपाटे, सतीश देशमुख, फिरोज खान, सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, अलीमोद्दीन खतिब, नजीमोद्दीन सैय्यद, विकास गुडधे, सचिन भोयर, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, रणजित गावंडे, अशोक खंगार, किशोर खेंगरे, निखिल माहुरे यांच्या पथकाने केली. त्यांना सायबर शाखेचे विशेष सहकार्य लाभले.