बनावट सोने गहाण ठेवून सराफा व्यापार्यांना लाखोंचा गंडा, दोन आरोपी अटक
ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

अमरावती /24 नोव्हेंबर : अंजनगाव सुर्जी परिसरात बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून सराफा व्यापार्यांना लाखोंना गंडा घालणार्या दोन गुन्हेगारांना ग्रामीण गुन्हे शाखा आणि अंजनगाव सुर्जी पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेड्या ठोकल्या. या कारवाईत आरोपींकडून रोख रकमेसह दुचाकी आणि मोठ्या प्रमाणात बनावट दागिने असा एकूण 7 लाख 49 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे गोविंद गोपाळराव लोखंडे (35, रा. भातकुली तहसीलमधील आष्टी) आणि मनोज त्र्यंबकराव दुधाणे (41, रा. नागपूर) अशी आहेत.
अंजनगाव सुर्जी येथील सराफा व्यापारी प्रिन्स रामलाल अग्रवाल यांनी 22 नोव्हेंबर रोजी पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, एका व्यक्तीने त्यांच्या दुकानात सोन्याच्या बांगड्या तारण ठेवत 3 लाख 50 हजार रुपये, तर 5 नोव्हेंबर रोजी बनावट सोन्याची साखळी गहाण ठेवून 1 लाख 10 हजार रुपये घेतले. यापूर्वीही अंजनगाव येथील दीपाली ज्वेलर्सचे मालक नरेंद्र चव्हाण यांना 80 हजार रुपये, तर पल्लवी ज्वेलर्सचे मालक अतुल दाणेज यांना 50 हजार रुपये अशा पद्धतीने फसवण्यात आले होते. एकूण 6 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रारींनंतर गुन्हा दाखल झाला. तक्रारीनंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ग्रामीण गुन्हे शाखेला तपासाची सूचना दिली. तपासादरम्यान एलसीबीचे अंजनगाव सुर्जी उपविभागाचे पीएसआय नितीन इंगोले यांच्या पथकाला माहिती मिळाली की दोघे संशयित दर्यापूर येथे सराफा लाईन परिसरात फिरत आहेत. त्यावर पथकाने सापळा रचून दोघांना दर्यापूरच्या सराफा बाजारातून जेरबंद केले. चौकशीत त्यांनी अंजनगावातील तिन्ही घटनांची कबुली दिली. फसवणूकीबाबत दोघांकडून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. ते परतवाडा, अचलपूर, चांदूर रेल्वे, दर्यापूर आणि चांदूर बाजार येथील सराफांना वेगवेगळ्या नावांनी बनावट दागिने तारण ठेवून फसवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून 6 लाख 9 हजार 600 रुपये रोख, नंबर नसलेली युनिकॉन दुचाकी, मोबाईल फोन (किंमत 40 हजार रुपये), चार साखळ्या, चार अंगठ्या, दोन ब्रेसलेट, 13 बांगड्या व इतर बनावट दागिने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात आरोपींनी उघड केले की ते दागिन्यांत 10 ग्रॅम वजन दाखवत असले तरी केवळ 2 ग्रॅम खरे सोने आणि 8 ग्रॅम अन्य धातूंचा वापर करत. त्यानंतर ते दागिने खर्यासारखे दाखवत तारणावर मोठी रक्कम घेत होते. याच पद्धतीने त्यांनी विविध ठिकाणांवर अनेक घटना घडवल्याचा उल्लेख तपासात आला आहे. दोघांकडून इतर ठिकाणांवरील फसवणूक, साथीदार आणि जाळ्याबाबत चौकशी सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




