मद्यधुंद महिलेची बेफाम कार, चार जणांना चिरडले
दोन भावांची प्रकृती गंभीर, नागरिकांमध्ये संतापाची लाट

* पोलिसांकडून तपास सुरू
अमरावती /20 नोव्हेंबर – गुरुवारी सकाळी शांत दिसणारा मोती नगर परिसर काही क्षणात भीती, गोंधळ आणि किंकाळ्यांनी भरून गेला. घड्याळात 11 वाजत आले होते आणि रोजच्याप्रमाणे फळ विक्रेते गाड्या लावत होते, लोकांची ये-जा सुरू होती. नेमक्या याच वेळी एमएच 34/के 5289 क्रमांकाची इंडिका कार विजेइतक्या वेगाने चौकात आली आणि डोळ्याच्या पापणी लवते न लवते तोच दारूधुंद अवस्थेत असलेल्या 25 वर्षीय महिलेने कार थेट फळ विक्रेत्याच्या गाडीवर आदळवली. धक्का इतका प्रचंड होता की फळांची गाडी काही फूट दूर फेकली गेली.
पण हा उधळलेपणा इथेच थांबला नाही. गाडीचा तोल सावरू न शकणारी महिला पुढे सरसावताच युनिकॉर्न व सीबीझेड या दोन मोटारसायकलींवर दणका बसला. त्या दुचाकींवरून जात असलेले संकेत रमेश फाटे (31) आणि निलेश रमेश फाटे (36) हे दोन्ही भाऊ रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या शरीराला गंभीर दुखापती झाल्या. दुसर्या दुचाकीवरील आनंद सिरसाठ (38) व फळ विक्रेते संजय मते (50) हेही जखमी झाले. रक्त सांडत असताना आजूबाजूची गर्दी घाबरत पळाली नाही-तर आक्रोश ऐकत तत्काळ घटनास्थळाकडे धावली. काहींनी जखमींना उचलून बाजूला केले, तर काहींनी वाहनातील महिलेला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. महिलेची अवस्था पाहून लोक स्तब्ध झाले-ती पूर्णपणे नशेच्या भरात होती, डोळे लाल, बोलण्यात तोल नव्हता. हीच महिला काही क्षणांपूर्वी रस्त्यावर दहशत माजवत होती, हे पाहून नागरिकांचा संताप प्रचंड वाढला आणि कारवर उतरणार्या रोषातून गाडीची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, गंभीर जखमी संकेत आणि निलेश यांना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात हलवले. डॉक्टरांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. दोघांचीही अवस्था गंभीर असल्याची प्राथमिक माहिती बाहेर आली. आनंद सिरसाठ आणि संजय मते यांनाही वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलिस, दामिनी पथक आणि सहाय्यक पोलिस आयुक्तांचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी प्रथम जमावाला आवर घातला आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतले. दामिनी पथकातील महिला कर्मचारी तिला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेल्या, जिथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत तिच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस ठाण्यात पोहोचताच स्टेशन ऑफिसरने महिलेला कडक शब्दांत जाब विचारला. चौकशीदरम्यान ती वारंवार उत्तर देण्यास असमर्थ ठरत होती. महिलेची चौकशी आणि अपघाताच्या परिस्थितीवर पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, फळ विक्रेते संजय पंढरीनाथ मते यांनी फ्रेझरपुरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध भादंवि कलम 281, 125(अ), 324(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन जप्त केले गेले आहे. पोलिसांनी तिच्या घराचा व पार्श्वभूमीचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत ती राहुल नगरची रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. मोती नगरात दिवसा घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दारू पिऊन वाहन चालवण्यावरील पोलिसी नियंत्रण अधिक कडक करावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास फ्रेझरपुरा पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.




