दोन्ही नगरपरिषदेतील सर्वच प्रभागामध्ये होणार रंगतदार लढती
नगराध्यक्ष पदाकरिता शेंदुरजनाघाटमध्ये 6 तर वरुडमध्ये 11 उमेदवार रिंगणात

वरुड । 20 नोव्हेंबर– शेंदुरजनाघाट आणि वरुड नगरपरिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणुक येत्या 2 डिसेंबरला होऊ घातली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसर्या दिवशी वरुड नगरपालिकेत नगरसेवकपदासाठी अवघ्या 2 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतले तर वरुड आणि शेंदुरजनाघाट या दोन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदा करीता एकही उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे वरुड नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी 11 तर नगरसेवक पदासाठी 122 तर शेंदुरजनाघाट नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 87 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. उद्या उमेदवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस असुन निवडणुक लढणार्या उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी चिन्हाचे वाटप झाल्यानंतर खर्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ होणार आहे. शेंदुरजनाघाट नगरपरिषदेत 1 नगराध्यक्ष व 20 नगरसेवक निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नगराध्यक्ष पदाकरीता भाजपाच्या वतीने सुवर्णा हरिभाऊ वरखडे, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मीना श्रीराम कोकोडे, शिवसेना उभाठा तर्फे प्रांजली कपिल तरार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वतीने शुभांगी संतोष धुर्वे, अपक्ष माला अजय कंगाले आणि करिष्मा शिकल धुर्वे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून 20 नगरसेवक पदांकरिता 87 नामनिर्देशन प्राप्त झाले आहेत. वरुड नगरपरिषदेत नगरपरिषदेत 1 नगराध्यक्षपदाकरीता 11 तर 26 नगरसेवक पदाकरिता 122 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदाकरीता अपक्ष धर्मेंद्र मनीराम उईके, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुनील किसनाजी तुमराम, अपक्ष तुषार मारोतराव धुर्वे, महाविकास आघाडीचे वतीने प्रशांत प्रल्हादराव धुर्वे, अशोक पुनाजी पंधरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वतीने चेतना राहुल बेलसरे, सुनील नत्थुजी वटके, सीमा अनिलराव सयाम, भाजपाच्या वतीने ईश्वर शिवकुमार सलामे, अपक्ष दिपांशु दीपक सलामे, अपक्ष निलेश सुभाषराव सिरसाम यांचा समावेश आहे. दोन्ही नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.




